पुणे : महाराष्ट्रात लव्ह जिहादविरोधी कठोर कायदा तत्काळ लागू करावा, अशी मागणी करत सकल हिंदू समाजाच्या महिला कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राखी बांधून ही ओवाळणी देण्याची मागणी शुक्रवारी केली.

नारळी पौर्णिमेचे औचित्य साधून सकल हिंदू समाजाच्या वतीने राज्यभर मोठ्या प्रमाणावर जनजागृती मोहिमेची सुरुवात झाली. या मोहिमेअंतर्गत हिंदू महिलांनी आपापल्या भागातील आमदार, खासदार, नगरसेवक आणि स्थानिक लोकप्रतिनिधींना राखी बांधून महाराष्ट्रात लव्ह जिहादविरोधी कठोर कायदा तत्काळ लागू करण्याची भावनिक मागणी केली. पुण्यातील शिवाजीनगर येथील पोलीस कवायत मैदान येथे सकाळी अकरा वाजता या उपक्रमाचा मुख्य सोहळा पार पडला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अनेक हिंदू महिलांनी राखी बांधली आणि लव्ह जिहादविरोधी कायद्याची जलद अंमलबजावणी करण्याची गरज पटवून दिली. पालकमंत्री अजित पवार, उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील या वेळी उपस्थित होते.

या उपक्रमाचे उद्दिष्ट केवळ राखी बांधण्यापुरते मर्यादित न राहता, हिंदू भगिनींच्या सन्मानाचे आणि सुरक्षिततेचे संरक्षण करणे असून, प्रेमाच्या नावाखाली होणाऱ्या जबरदस्तीने धर्मांतर, मानसिक छळ, मारहाण, लैंगिक अत्याचार आणि आत्महत्येसारख्या गंभीर घटनांना आळा घालण्यासाठी कठोर कायदा आवश्यक असल्याचे महिलांनी ठामपणे मांडले.

‘महाराष्ट्रात लव्ह जिहादच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. प्रेमाच्या नावाखाली अनेक हिंदू युवतींना फसवून नंतर जबरदस्तीने धर्मांतरास भाग पाडले जाते. या घटनांमध्ये मानसिक छळ, मारहाण, लैंगिक अत्याचार आणि आत्महत्येसारखे गंभीर प्रकार घडत असून त्याला आळा घालण्यासाठी स्वतंत्र आणि कठोर कायदा आवश्यक आहे. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, उत्तराखंड आणि गुजरात या राज्यांमध्ये लव्ह जिहादविरोधी कायदे अस्तित्वात आहेत. परंतु, महाराष्ट्रात मात्र अद्याप असा कोणताही कायदा नाही. परिणामी पोलिसांनाही कारवाई करताना कायदेशीर मर्यादा भेडसावत आहेत. म्हणून राज्य सरकारने तत्काळ कठोर कायदा संमत करून अंमलात आणावा,’ अशी मागणी मुख्यमंत्री फडणवीस यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.

रक्षाबंधनाच्या दिवशी बहीण भावाला राखी बांघताना त्याच्याकडून रक्षणाची अपेक्षा ठेवते. यंदा राखीच्या माध्यमातून भगिनी स्वत:च्या आणि इतर भगिनींच्या सन्मानासाठी कायदेशीर संरक्षणाची मागणी करत आहेत. या मोहिमेमध्ये किशोरी, गृहिणी, विद्यार्थीनी, महिला कर्मचारी यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग असून अनेक ठिकाणी मुली भाषणे आणि देशभक्तीपर गीतांद्वारे समाजजागृती करणार आहेत, असेही या प्रसिद्धीपत्रकामध्ये नमूद करण्यात आले आहे.