पुण्यातील संस्थेचे संशोधन, शहरात संकलन सुरू

राज्यात प्लास्टिक बंदीचा निर्णय लागू करण्यात आल्यानंतर आपल्याकडील प्लास्टिकचे काय करायचे, हा प्रश्न सर्वानाच पडलेला आहे. पुण्यातील ‘रुद्र एन्व्हायर्नमेंटल सोल्यूशन इंडिया लिमिटेड’ संस्थेने संशोधनातून प्लास्टिक पासून इंधन बनवणे (पॉलिफ्युएल) शक्य असल्याचे सिद्ध केले आहे. ३०० किलो प्लास्टिकच्या ज्वलनातून सुमारे १८० ते २१० लिटर इंधन तयार होत असल्याचेही संस्थेकडून सांगण्यात आले.

राज्यातप्लास्टिक बंदीचा निर्णय झाल्यानंतर सर्व समाजमाध्यमांमध्ये प्लास्टिक संकलित करून त्या बदल्यात पर्यावरण पूरक पर्याय कसे वापरात आणावेत याबद्दलची चर्चा सुरू आहे. ‘रुद्र एन्व्हायर्नमेंटल सोल्यूशन्स इंडिया लिमिटेड’ ही संस्था गेली ४ वर्षे शहरातील गृह निर्माण संस्थांमध्ये जाऊन प्लास्टिक संकलन करत आहे. मेधा ताडपत्रीकर यांनी या उपक्रमाबाबत तसेच इंधन निर्मितीतील संशोधनाबद्दल ‘लोकसत्ता’ला माहिती दिली.

मेधा ताडपत्रीकर म्हणाल्या, एका अभयारण्यात सहलीसाठी गेलो असता तेथील २ हरणांचा मृत्यू झाल्याचे समजले. शवविच्छेदन अहवालात त्यांच्या पोटात प्लास्टिक मिळाल्यामुळे हरणे दगावल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे प्लास्टिक कायमचे नष्ट करण्यासाठी काय करता येईल या विचारातून संशोधनाला सुरुवात झाली. संशोधन करण्यासाठी प्लास्टिक हवे म्हणून मी माझ्या गाडीतून गृहनिर्माण संस्थांमध्ये जाऊन प्लास्टिक संकलन करण्यास सुरुवात केली. आज महिन्याला सुमारे १६ हजार घरांमधून सुमारे २० टन प्लास्टिकचे संकलन केले जात आहे. सध्या कार्यरत असलेल्या यंत्रात एकावेळी ५०० किलो प्लास्टिक इंधनात रूपांतर करण्याची क्षमता आहे, असे त्यांनी सांगितले.

मुंबईतील प्लास्टिक विल्हेवाटीसाठी पुण्यात

३७ प्लास्टिकच्या पिशव्या द्या आणि पर्यावरण पूरक पिशवी मिळवा असा इकोसॅक कंपनीचा संदेश समाजमाध्यमांवर चांगलाच वेगाने पसरत आहे. मात्र ही संकलन योजना केवळ मुंबई शहरापुरती असून इंधन निर्मितीसाठी संकलित प्लास्टिक पुण्यातील रुद्र एन्व्हायर्नमेंटल सोल्यूशन्स इंडिया लिमिटेडकडेच पाठवले जात असल्याचे ‘इकोसॅक’चे अनिल चौटा यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.

कुरिअरद्वारे संकलन

या संशोधनाबद्दल समजताच गेली २ वर्षे दिल्ली, चेन्नई, जम्मू, विशाखापट्टणम अशा देशाच्या विविध भागातील शहरांमधून प्लास्टिक कुरिअरने पाठवले जात आहे. प्लास्टिक बंदीच्या निर्णयानंतर संकलनासाठी होणाऱ्या चौकशीचा ओघ वाढला आहे. गेल्या २ दिवसात सुमारे ३ हजार नागरिकांनी फोन करून प्लास्टिक संकलनासाठी रुद्रला पाचारण केले आहे. प्लास्टिक देण्यासाठी ९३७३०५३२३५ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पालिका उदासीन

प्लास्टिक बंदीनंतर सर्वाधिक कारवाई पुणे महापालिका क्षेत्रात केली जात आहे. मात्र शहरात झालेल्या या संशोधनाबद्दल महापालिका आणि लोकप्रतिनिधीच उदासिन असल्याचे चित्र आहे.