पुणे : यंदाच्या दिवाळीत पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये फटाक्यांमुळे ध्वनिप्रदूषणात मोठी वाढ झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत या दिवाळीत फटाक्यांचा आवाज अधिक नोंदविण्यात आला. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिवाळीच्या काळात केलेल्या नोंदीनुसार सातारा रस्ता आणि लक्ष्मी रस्ता परिसरात ध्वनिप्रदूषणात सर्वाधिक वाढ झाल्याचे समोर आले आहे.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिवाळीतील दुसऱ्या दिवशी २० ऑक्टोबर व तिसऱ्या दिवशी २१ ऑक्टोबरला पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये १४ ठिकाणी आवाजाच्या नोंदी घेतल्या. त्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा दिवाळीत आवाजाची पातळी जास्त नोंदविण्यात आली. यंदा लक्ष्मीपूजनादिवशी (ता. २१) सातारा रस्ता आणि लक्ष्मी रस्ता परिसरात सर्वाधिक ध्वनिप्रदूषण नोंदविण्यात आले.
सातारा रस्ता परिसरात यंदा दिवाळीत आवाजाची पातळी दिवसा ९७ डेसिबल तर रात्री ९३.६ डेसिबल नोंदविण्यात आली. गेल्या वर्षी दिवाळीत या परिसरात आवाजाची पातळी दिवसा ९६ डेसिबल तर रात्री ८८.९ डेसिबल होती. लक्ष्मी रस्ता परिसरात यंदा आवाजाची पातळी दिवसा ९६.१ डेसिबल तर रात्री ९४.४ डेसिबल नोंदविण्यात आली. स्वारगेट परिसरात रात्रीची आवाजाची पातळी ९४.६ डेसिबल झाली असून, गेल्या वर्षी ती ८४.६ डेसिबल होती, असे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे.
कर्वे रस्त्यावर आवाजाची पातळी यंदाच्या दिवाळीत दिवसा ९६.५ डेसिबल तर रात्री ८९.४ डेसिबल नोंदविण्यात आली. गेल्या वर्षी ही पातळी दिवसा ९२.५ डेसिबल तर रात्री ८४.५ डेसिबल होती. खडकीमध्ये आवाजाची पातळी दिवसा ९४.८ डेसिबल आणि रात्री ९१.२ डेसिबल होती. गेल्या वर्षी ही पातळी दिवसा ८६.५ आणि रात्री ८२.५ डेसिबल होती. शनिवारवाडा, येरवडा आणि सारसबाग परिसरात रात्रीची आवाज पातळी ८६ ते ९० डेसिबल नोंदवली गेली. पिंपरी-चिंचवडमध्ये पिंपरीत आवाजाची पातळी दिवसा ९४.१ डेसिबल तर रात्रीची पातळी ८०.४ डेसिबल नोंदवली गेली. निगडीत आवाजाची पातळी दिवसा ९३.९ डेसिबल नोंदविण्यात आली.
ध्वनिप्रदूषण नियमांचा भंग
ध्वनिप्रदूषणाची मर्यादा निवासी भागात दिवसा ५५ डेसिबल आणि रात्री ४५ डेसिबल आहे. ही मर्यादा वाणिज्य भागात दिवसा ६५ डेसिबल आणि रात्री ५५ डेसिबल आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिवाळीत पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये नोंदी घेतलेल्या सर्वच्या सर्व ठिकाणी ध्वनिप्रदूषण मर्यादेचा भंग झाल्याचे निदर्शनास आले आहे. काही ठिकाणी तर आवाजाची पातळी ध्वनिप्रदूषण मर्यादेच्या दुप्पट असल्याचे दिसून येत आहे.
