पुणे : रस्ता सुरक्षेसंदर्भात व्यापक जनजागृती करण्यासाठी राज्यातील १९ जिल्ह्यांमध्ये ‘रस्ता सुरक्षा मित्र’ हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालय, युवक आणि क्रीडा मंत्रालय यांच्यातर्फे राबवल्या जाणाऱ्या या उपक्रमात महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना सहभागी करून घेतले जाणार असून, १५ ऑगस्टपासून या उपक्रमाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
रस्ते अपघात ही देशातील मोठी समस्या आहे. २०२२ मध्ये देशात ४ लाख ६१ हजार ३१२ अपघातांची नोंद झाली होती. त्यात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये २५ वर्षांखालील तरुणांची संख्या २५ टक्के आहे. आपत्कालीन स्थितीमध्ये मदत मिळण्यास उशीर झाल्याने, प्रथमोपचारांची माहिती नसल्याने, सामाजिक पातळीवर सहभागाचा अभाव यामुळेही बरेच मृत्यू झाले आहेत. या पार्श्वभूमीवर रस्ता सुरक्षेबाबत तातडीने जिल्हा, स्थानिक पातळीवर काम करण्याची गरज व्यक्त करून केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालय, युवक आणि क्रीडा मंत्रालयाने युवा स्वयंसेवकांना सहभागी करून घेणारा ‘रस्ता सुरक्षा मित्र’ हा उपक्रम हाती घेतला आहे. त्यासाठी देशभरातील १०० जिल्हे निश्चित करण्यात आले आहेत.
उपक्रमामध्ये राज्यातील नाशिक, पुणे, अहिल्यानगर, सोलापूर, जळगाव, सातारा, छत्रपती संभाजीनगर, बीड, नागपूर, धुळे, यवतमाळ, जालना, अमरावती, कोल्हापूर, नांदेड, चंद्रपूर, बुलढाणा, सांगली, मुंबई या जिल्ह्यांचा समावेश आहे. उपक्रमासाठी उच्च माध्यमिक ते पदवी अभ्यासक्रमाच्या १८ ते २८ या वयोगटातील विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रशिक्षित स्वयंसेवकांकडून हेल्मेटचा वापर करणे, सीट बेल्ट लावणे, वेगमर्यादेचे पालन करणे याबाबत जागृती करण्यात येईल. या उपक्रमातून आपत्कालीन परिस्थितीत झटपट प्रतिसाद आणि योग्य व्यवस्थापन, समाज सुरक्षेमध्ये तरुणांचा सहभाग, विद्यार्थी, प्रशासन आणि स्थानिक अधिकारी यांच्यात समन्वय, रस्ते सुरक्षा मंडळ यांच्याशी समन्वय उपक्रमात उत्तम काम करणाऱ्या स्वयंसेवकांना प्रमाणपत्र प्रदान केले जाणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
क्षेत्रभेटींद्वारे अभ्यास
उपक्रमात सहभागी स्वयंसेवकांना क्षेत्रभेटींद्वारे अभ्यास करण्याची संधी मिळणार आहे. रस्ते सुरक्षेतील अडचणी लक्षात घेऊन उपाययोजना सुचवणे, ब्लॅकस्पॉट आणि ठिकाणे निश्चित करणे, ग्रीन कॉरिडॉर्स तयार करणे, अपघातस्थळी मदत करणे अशा कामांचा समावेश आहे. त्यासाठी त्यांना जिल्हा प्रशासन, महापालिका प्रशासन, पोलीस, वैद्यकीय अशा विभागांबरोबर काम करता येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.