पुणे : राज्यातील पाचवी आणि आठवी इयत्तांसह चौथी आणि सातवी या इयत्तांसाठीही यंदा शिष्यवृत्ती परीक्षा घेण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला. त्यानुसार चौथी आणि सातवीच्या परीक्षांसाठीचा अभ्यासक्रम राज्य परीक्षा परिषदेने जाहीर केला असून, या अभ्यासक्रमानुसार विद्यार्थ्यांना परीक्षेची तयारी करावी लागणार आहे.
राज्यातील विद्यार्थ्यांना स्पर्धात्मकतेकरिता प्रोत्साहन देण्यासाठी शिष्यवृत्ती परीक्षा आयोजित करण्यात येते. पूर्वी ही परीक्षा चौथी आणि सातवी या इयत्तांसाठी घेतली जात होती. मात्र, शिक्षण हक्क कायद्यातील (आरटीई) तरतुदी लक्षात घेऊन २०१६-१७ पासून ही परीक्षा पाचवी आणि आठवी या वर्गांसाठी लागू करण्यात आली. पाचवी आणि आठवीला शिष्यवृत्ती परीक्षा लागू केल्यापासून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत घट झाल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे शिक्षण विभागाने पूर्वीप्रमाणेच चौथी आणि सातवीसाठी शिष्यवृत्ती परीक्षा लागू करण्याचा निर्णय घेतला.
यंदा विशेष बाब म्हणून चौथी, सातवी, पाचवी, आठवी या इयत्तांसाठी परीक्षा घेतली जाणार आहे. या परीक्षेचा अभ्यासक्रम जाहीर होण्याची शिक्षक, विद्यार्थ्यांना प्रतीक्षा होती. त्यानुसार राज्य परीक्षा परिषदेने परीक्षेसाठीचा अभ्यासक्रम संकेतस्थळावर जाहीर केला आहे. चौथी आणि सातवीच्या परीक्षेत गणित, बुद्धिमत्ता चाचणी, प्रथम भाषा, इंग्रजी (तृतीय भाषा) या विषयांचा समावेश आहे.
मराठीसह ऊर्दू, इंग्रजी, हिंदी, गुजराती, तेलुगू, कन्नड या माध्यमांतही परीक्षा घेतली जाते. चौथीच्या अभ्यासक्रमामध्ये प्रथम भाषेसाठी आकलन, शब्दसंपत्तीवरील प्रभुत्व, कार्यात्मक व्याकरण, भाषाविषयक सामान्य ज्ञान; गणितामध्ये संख्याज्ञान, संख्यांवरील क्रिया, अपूर्णांक, मापन, आकृतीबंध, भूमिती, चित्रालेख; इंग्रजी तृतीय भाषेमध्ये शब्दसंग्रह, विरामचिन्हे, संख्या माहिती, व्याकरण, चिकित्सक विचार; बुद्धिमत्ता चाचणीसाठी आकलन, वर्गीकरण, सहसंबंध, क्रम ओळखणे, गटाशी जुळणारे पद, जलप्रतिबिंब, आरशातील प्रतिमा, तर्कसंगती, अनुमान, कूटप्रश्न, सांकेतिक भाषा असा अभ्यासक्रम आहे.
सातवीच्या प्रथम भाषेसाठी आकलन, शब्दसंपत्तीवरील प्रभुत्व, कार्यात्मक व्याकरण, पहिली ते सातवीच्या मराठी विषयाशी संबंधित सामान्य ज्ञान, गणितासाठी संख्याज्ञान, संख्यांवरील क्रिया, भूमिती, महत्त्वमापन, सांख्यिकी, व्यावहारिक गणित, बीजगणित; इंग्रजी तृतीय भाषेसाठी शब्दसंपदा, शब्दकोडी, भाषा अभ्यास, व्याकरण, सर्जनशील लेखन, वाचन कौशल्य, आकलन, वर्गीकरण, सहसंबंध, क्रम ओळखणे, गटाशी जुळणारे पद, जलप्रतिबिंब, आरशातील प्रतिमा, तर्कसंगती, अनुमान, कूटप्रश्न, सांकेतिक भाषा, मनोरे, आकृतीचे पृथःकरण असा अभ्यासक्रम आहे.
मंजूर अभ्यासक्रमानुसार आता चौथी, सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी प्रश्नपत्रिका तयार केल्या जाणार आहेत. शासन निर्णयानुसार एप्रिल-मेमध्ये परीक्षा घेण्याचे नियोजन आहे. जानेवारीमध्ये परीक्षेची नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात येईल. – नंदकुमार बेडसे, अध्यक्ष, राज्य परीक्षा परिषद.
