पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सभागृहात शांततामय पद्धतीने हाती फलक घेऊन निषेध व्यक्त करण्यासाठी आलेल्या आजीव सभासदाच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार शनिवारी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत घडला. याच सभेत परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला.
प्रकृती अस्वास्थ्यामुळे उपस्थित राहू न शकलेले अध्यक्ष डाॅ. रावसाहेब कसबे यांच्याऐवजी उपाध्यक्ष डाॅ. तानाजीराव चोरघे यांच्या अध्यक्षतेखाली परिषदेची वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवारी पार पडली. त्यामध्ये हा अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडला. परिषदेच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष डाॅ. शिवाजीराव कदम, उपाध्यक्ष राजीव बर्वे, कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह सुनीताराजे पवार आणि कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी सभेस उपस्थित होते.
पदाधिकाऱ्यांविरोधात यापूर्वी धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार दाखल असताना, त्यांना अशी सभा घेण्यापासून रोखण्याची मागणी राजकुमार धुरगुडे यांनी धर्मादाय आयुक्तांकडे केली होती. ‘सत्य जरी एकला-असत्याला पुरून उरला’ आणि ‘मसापचे पवित्र मंदिर, नाही कुणाची खासगी जागीर’ अशा आशयाचे फलक घेऊन धुरगुडे हे डाॅ. कदम यांचे मनोगत सुरू असताना सभागृहात आले. मात्र, काही सभासदांनी त्यांच्या कृतीला आक्षेप घेऊन सभागृहाबाहेर जाण्यास सांगितले. त्यातच एका पदाधिकाऱ्याने व्यासपीठावरून येऊन हस्तक्षेप केल्यानंतर काही जण धुरगुडे यांच्या अंगावर गेले. धुरगुडे सभागृहातून बाहेर पडल्यानंतर उर्वरित सभा पार पडली.
दरम्यान, ‘मला धक्काबुक्की झाली नाही. मी दोन हात करण्यासाठी समर्थ आहे. पण, काही जण अंगावर धावून येत पुढे आल्यामुळे मी मागे सरकलो,’ असे राजकुमार धुरगुडे यांनी सांगितले. ‘परिषदेचे आजीव सभासद असलेले धुरगुडे एकटे आले असते, तर त्यांना सभागृहात घेतले असते. मात्र, त्यांच्यासमवेत आलेले परिषदेचे सभासद नसल्याने त्यांना बाहेर काढावे लागले,’ असे स्पष्टीकरण परिषदेच्या प्रमुख कार्यवाह सुनीताराजे पवार यांना दोनदा द्यावे लागले.
वार्षिक सभेमध्ये नैमत्तिक विषय संमत झाल्यानंतर विनाेद कुलकर्णी यांनी परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. २२ डिसेंबरपासून सुरू होणारी प्रक्रिया निवडणूक झालीच, तर १५ मार्च रोजी नवी कार्यकारिणी अस्तित्वात येईल. ५ फेब्रुवारी रोजी मतपत्रिका पाठविण्यात येणार असून, १३ मार्चपर्यंत आलेल्या मतपत्रिका ग्राह्य धरल्या जातील.
ॲड. प्रताप परदेशी यांची मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, त्यांना संजीव खडके, प्रभा साेनवणे आणि गिरीश केमकर हे साहाय्य करणार आहेत, अशी घोषणा या वेळी करण्यात आली.
सभासद नोंदणीच्या प्रश्नाला बगल
वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्षांच्या मनोगतापूर्वी एका सभासदाने महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सभासद नोंदणीविषयी प्रश्न विचारला. सभासद नोंंदणी होत नसल्याने शाखांनी नवे सभासद घ्यावेत की नाहीत, असे त्यांनी विचारले. मात्र, या विषयावर सभेनंतर कार्यालयामध्ये बोलू, असे सांगत पदाधिकाऱ्यांनी या प्रश्नाला बगल दिली.
महाराष्ट्र साहित्य परिषद हुकूमशाही पद्धतीने चालणार नाही. निवडणूक घेण्याची मागणी करणारे निवडणूक जाहीर झाल्यानंतर आता परिषदेवर प्रशासक नियुक्त करा, अशी मागणी करू लागले आहेत. अशा साहित्यबाह्य शक्तींचा डाव उधळून लावला पाहिजे. – प्रा. मिलिंद जोशी, कार्याध्यक्ष, महाराष्ट्र साहित्य परिषद
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या अनधिकृत कार्यकारिणीने घेतलेल्या अनधिकृत वार्षिक सभेत केलेली निवडणुकीची घोषणा ही घटनाविरोधी कृती आहे. त्यामुळे संस्थेवर प्रशासक नेमून त्यांच्या नियंत्रणाखाली पारदर्शक पद्धतीने निवडणूक व्हावी, यासाठी धर्मादाय आयुक्तांकडे याचिका दाखल केली आहे. – धनंजय कुलकर्णी, कार्याध्यक्ष, महाराष्ट्र साहित्य परिषद संरक्षण कृती समिती