पुणे : राज्यात जुलैच्या पहिला पंधरावड्यात मोसमी पावसाने सर्वदूर हजेरी लावली. राज्यात सरासरीच्या पंधरा टक्के अधिक पाऊस पडला असला तरीही विदर्भ, सातारा, नंदूरबार, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात अद्यापही दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, १५ जुलैअखेर राज्यात सरासरीच्या तुलनेत १५ टक्के जास्त पाऊस झाला आहे. एक जून ते १५ जुलै, या काळात राज्यात सरासरी ३६०.८ मिमी पाऊस पडतो, प्रत्यक्षात ४१५.६ मिमी पाऊस झाला आहे. कोकण विभागात नुकत्याच झालेल्या पावसाने सरासरी भरून काढली आहे. सरासरीच्या तुलनेत मुंबई शहरात ८ टक्के, मुंबई उपनगरे २६ टक्के, पालघर १८ टक्के, रायगड २५ टक्के, रत्नागिरी ३१ टक्के, सिंधुदुर्ग ३८ आणि ठाणे जिल्ह्यात १५ टक्के जास्त पाऊस पडला आहे.
हेही वाचा >>> किनारपट्टी, घाटमाथ्यावर पावसाचा जोर; रायगडला लाल इशारा
मध्य महाराष्ट्रात सरासरीच्या २२ टक्के अधिक पाऊस पडला आहे. सरासरी ३६४.३ मिमी पाऊस पडतो, प्रत्यक्षात ३२१ मिमी पाऊस पडला आहे. नगरमध्ये ४१ टक्के, धुळे २० टक्के, जळगाव ६० टक्के, कोल्हापूर ५ टक्के, नाशिक ८ टक्के, पुणे २२ टक्के, सांगली ४१ टक्के आणि सोलापुरात ८४ टक्के अधिक पाऊस पडला आहे. तर सरासरीपेक्षा कमी पाऊस साताऱ्यात आणि नंदूरबारमध्ये झाला आहे. साताऱ्यात ८ टक्के आणि नंदूरबारमध्ये १९ टक्के कमी पाऊस झाला.
मराठवाड्यात सरासरीपेक्षा १८ टक्के अधिक पाऊस झाला. हिंगोली आणि नांदेड वगळता अन्य जिल्ह्यांत सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. सरासरी २१२.२ मिमी पाऊस पडतो, प्रत्यक्षात २५१.४ मिमी पाऊस पडला आहे. बीडमध्ये ४० टक्के, छत्रपती संभाजीनगर ११ टक्के, धाराशिव ९२ टक्के, जालना २१ टक्के, लातूर ५२ टक्के आणि परभणीत २४ टक्के अधिक पाऊस पडला आहे. सरासरीच्या तुलनेत हिंगोलीत ६७ टक्के आणि नांदेडमध्ये १२ टक्के कमी पाऊस पडला आहे.
हेही वाचा >>> ‘हमीभावा’चा राजकीय हत्यारासारखा वापर; शेतकऱ्यांना अत्यल्प मदत; ‘एसबीआय’च्या अहवालातील माहिती
विदर्भात सरासरी ३१९.१ मिमी पाऊस पडतो, यंदा ३०१.१ मिमी पाऊस झाला आहे. विदर्भात सरासरीच्या तुलनेत सहा टक्के कमी पाऊस पडला. ११ पैकी ६ जिल्ह्यांत कमी पावसाची नोंद झाली आहे. अमरावतीत १८ टक्के, भंडारा ३६ टक्के, चंद्रपूर १२ टक्के, गडचिरोली २१ टक्के, गोंदियात ३१ टक्के आणि नागपुरात सरासरीच्या २१ टक्के कमी पावसाची नोंद झाली आहे. सरासरीपेक्षा जास्त पाऊस चार जिल्ह्यांत झाला आहे. अकोल्यात १२ टक्के, बुलडाण्यात ३१ टक्के, वर्धा ५ टक्के, वाशिम २४ टक्के आणि यवतमाळमध्ये २९ टक्के अधिक पाऊस झाला आहे.
धाराशिवमध्ये सर्वांधिक, हिंगोलीत सर्वांत कमी
राज्यात धाराशिव जिल्ह्यात सरासरीपेक्षा ९२ टक्के अधिक पाऊस पडला आहे. सरासरी १८२.८ मिमी पाऊस पडतो, यंदा ३५१.७ मिमी पाऊस पडला आहे. हिंगोलीत सरासरीच्या तुलनेत ६७ टक्के कमी पाऊस झाला आहे. सरासरी २७७.७ मिमी पाऊस पडतो, यंदा ९१.७ मिमी पाऊस पडला आहे. धाराशिवला लागून असलेल्या सोलापुरातही सरासरीच्या ८४ टक्के जास्त पाऊस पडला आहे.