पुणे : इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीमध्ये दिवसेंदिवस होत असलेली वाढ ध्यानात घेत महावितरणने इलेक्ट्रिक वाहनांसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या चार्जिंग स्थानकांच्या उभारणीला वेग दिला आहे. पुणे परिमंडल अंतर्गत सद्यस्थितीत १५ चार्जिंग स्थानके कार्यान्वित झाली आहेत. भविष्यात पुणे व पिंपरी चिंचवड शहर आणि लगतच्या राष्ट्रीय महामार्गावर आणखी चार्जिंग स्थानकांची उभारणी करण्यात येणार आहे.

सेनापती बापट रस्त्यावरील गणेशखिंड उपविभाग कार्यालयाच्या परिसरात नव्याने उभारलेल्या इलेक्ट्रिक स्थानकाचे उद्घाटन महावितरणचे संचालक (प्रकल्प) प्रसाद रेशमे यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते.  पुणे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे आणि पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता राजेंद्र पवार, अधीक्षक अभियंता शंकर तायडे, सतीश राजदीप, युवराज जरग, अरविंद बुलबुले, प्रवीण पंचमुख, डॉ. सुरेश वानखेडे या वेळी उपस्थित होते.

हेही वाचा >>>पिंपरी- चिंचवडमध्ये भरदिवसा एकावर झाडल्या गोळ्या; आरोपी फरार

रेशमे म्हणाले की, राज्य शासनाने ई-वाहन धोरणाद्वारे महावितरणची इलेक्ट्रिक वाहनांना चार्जिंग सुविधा पुरविण्यासाठी राज्य नोडल एजन्सी म्हणून नियुक्ती केली आहे. ही जबाबदारी स्वीकारून आणि ई-वाहनांचा वाढता वापर पाहता महावितरणकडून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे चार्जिंग स्थानके उभारण्यासाठी तसेच नवीन चार्जिंग स्थानकांना सुलभ प्रक्रियेद्वारे तत्पर वीजजोडणी देण्यासाठी गती देण्यात आली आहे. त्यासाठी एक खिडकी स्वतंत्र वेबपोर्टल उपलब्ध आहे. तसेच इव्ही ग्राहकांसाठी पॉवर ॲप उपलब्ध करून दिले आहे. या ॲपमध्ये चार्जिंग स्थानकाचे लोकेशन, चार्जिंगसाठी लागणारा वेळ, वापरलेले वीज युनिट, पेमेंटसाठी वॉलेट आणि बॅलन्स याची माहिती ग्राहकांना उपलब्ध होत आहे.

हेही वाचा >>>अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यावसायिकाच्या कुटुंबीयांना सहा वर्षांनी मोटार अपघात न्यायप्राधिकरणाने दिला ‘असा’ न्याय…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुणे परिमंडलामध्ये सद्यस्थितीत १५ उपकेंद्राच्या ठिकाणी महावितरणकडून इव्ही चार्जिंग स्थानक कार्यान्वित करण्यात आले आहेत. यामध्ये संघवीनगर (औंध), रिजन्सी इन्फ्रा (ननावरे वस्ती, औंध), गणेशखिंड उपविभाग कार्यालय परिसर (सेनापती बापट रस्ता), अमर पॅरॅडिगम (बाणेर), बेंचमार्क उपकेंद्र (पुनावळे, मुंबई हायवे), प्राधिकरण स्विचिंग स्टेशन (पुनावळे, मुंबई-पुणे महामार्ग), सीआयआरटी उपकेंद्र (कासारवाडी, पुणे-नाशिक महामार्ग), कुणाल आयकॉन स्विचिंग स्टेशन (पिंपळे सौदागर), सेक्टर १० स्विचिंग स्टेशन (भोसरी), सीडीसी स्विचिंग स्टेशन (स्पाईन रोड, शाहूनगर), ब्रह्मा सनसिटी (वडगाव शेरी), झेन्सार स्विचिंग स्टेशन (खराडी), कीर्ती कॅसल स्विचिंग स्टेशन (वडगाव शिंदे, लोहगाव), रेसकोर्स उपकेंद्र (रेस कोर्स), राजगुरुनगर उपकेंद्र (कडूस फाटा, चांडोळी, ता. खेड) येथील चार्जिंग स्थानकांचा समावेश आहे.