पिंपरी : महिलेच्या परस्पर तिच्या बँक खात्यावर पैसे पाठवून अवास्तव कर्ज रक्कमेची मागणी केली. पैसे भरण्यास नकार दिल्याने त्या महिलेचे न्यूड छायाचित्र तिच्या नातेवाईकांच्या व्हॉट्सॲपवर पाठविल्याप्रकरणी १५ मोबाईल धारकांवर आणि तीन युपीआय आयडी धारकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ११ ते २२ जून दरम्यान म्हाळुंगे येथे घडली.

याप्रकरणी महिलेने सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार इसाकी राजन इसाकी मुथु थेवर (वय २९, वाशी, नवी मुंबई) याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या व्हॉट्सॲपवर एका कर्ज देणाऱ्या ॲपची लिंक पाठविली. त्या लिंकद्वारे फिर्यादी यांच्या मोबईलवरील सर्व माहिती आरोपींनी घेतली.

त्यानंतर फिर्यादी यांच्या परस्पर त्यांच्या बँक खात्यावर पाच हजार ४०० रुपये पाठविल्याचे सांगितले. त्याबदल्यात फिर्यादी यांनी कर्ज रक्कम म्हणून ९ हजार ऑनलाईन भरले. त्यानंतरही आरोपींनी फिर्यादी यांना १५ हजार रुपये भरण्यास सांगितले. तसेच ही रक्कम न भरल्यास त्यांच्या मोबाईलमधील सर्व मोबाईलधारकांना फिर्यादी यांचे मॉर्फ केलेले न्यूड छायाचित्र पाठविण्याची धमकी दिली. फिर्यादी यांनी पैसे भरण्यास नकार दिला असता फिर्यादी यांचे न्यूड छायाचित्र त्यांच्या नातेवाईकांच्या व्हॉट्सॲपवर पाठविले.

सदनिका खरेदीच्या बहाण्याने २७ लाख ५० हजारांची फसवणूक

एका फायनान्स कंपनीकडून लिलावात विकत घेतलेली सदनिका आहे असे खोटे सांगून ती सदनिका खरेदी करून देत असल्याचे भासवून तिघांनी मिळून एकाची २७ लाख ५० हजारांची फसवणूक करण्यात आली. ही घटना रावेत येथे घडली.

याप्रकरणी लक्ष्मण विश्वनाथ रणवरे (वय ४५, काळेवाडी) यांनी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी संगनमत करून फिर्यादी यांना रावेत येथील सदनिका फायनान्स कंपनीकडून लिलावात विकत घेतल्याचे खोटे सांगितले. ती सदनिका फिर्यादी यांना खरेदी करून देतो असे भासविले. आरोपीने फायनान्स कंपनीचा कर्मचारी असल्याचे सांगितले. आरोपींनी फिर्यादी यांच्याकडून २७ लाख ५० हजार घेत फसवणूक केली.

पिंपरीत वाहनांची तोडफोड

आम्ही इथले भाई आहोत. आमच्या नादाला तुम्ही लागू नका, असे म्हणत रस्त्याकडेला लावलेल्या दोन बस आणि इतर मोटारीच्या काचा फोडल्याप्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे. ही घटना गुरूवारी रात्री पिंपरीतील साधु वासवाणी उद्यानासमोर घडली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याप्रकरणी घनशाम त्रिलोकनाथ गुप्ता (वय ३४, वैभवनगर, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार स्वराज गणेश पानकडे (वय १९), आशिष राजेंद्र जाधव (वय २५), शिवराज भाऊसाहेब खोसे (वय २२, सर्व रा. पिंपळेनिलख), सुशांत महादेव शेंडगे (वय २३, पिंपळेगुरव) यांना अटक करण्यात आली आहे. तसेच आणखी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुप्ता यांनी त्यांच्या मालकीच्या दोन बस रस्त्याच्या कडेला लावल्या होते. आरोपींनी लाकडी दांडके व दगडाने दोन्ही बसच्या काचा फोडल्या. यासंदर्भात गुप्ता यांनी जाब विचारला असता आरोपींनी त्यांना मारहाण करून जखमी केले. तसेच बससोबतच अन्य गाड्यांच्याही काचा फोडून हातातील दांडके हवेत फिरवून आम्ही इथले भाई आहोत. आमच्या नादाला तुम्ही लागू नका, असे म्हणत परिसरात दहशत निर्माण केली.