पिंपरी चिंचवड: मद्यपान करत असताना पत्नीबाबत अश्लील शब्द वापरल्याने मित्राची नाशिक फाटा येथील पुलावरून ढकलून देऊन हत्या केली आहे. या घटनेमुळे पिंपरी- चिंचवड शहरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी वाकड पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. सिद्धांत रतन पाचपिंडे आणि प्रतीक रमेश सरवदे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून दिनेश दशरथ कांबळे असं हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. दिनेश हा गेल्या सहा महिन्यापासून बेपत्ता होता. त्याच्या आईने वाकड पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती. त्यानंतर या हत्येचे गूढ उलगडले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनेश दशरथ कांबळे हा सहा महिन्यापासून बेपत्ता असल्याची तक्रार आई माया दशरथ कांबळे यांनी नुकतीच वाकड पोलीस ठाण्यात दिली होती. दिनेश हा नेहमीच घराच्या बाहेर जायचा. दहा ते पंधरा दिवस तो घरी परतत नसायचा. वडिलांची सोन्याची चैन घेऊन तो घरातून बाहेर पडला होता. त्यामुळे त्याची आई त्याच्यावर संतापली देखील होती. सोन्याची चैन परत घेऊन येतो म्हणून तो घरातून बाहेर पडला आणि तो घरी परतलाच नाही. तो परत येईल या अपेक्षेने आई- वडिलांनी तो बेपत्ता झाल्याची उशिरा तक्रार दिल्याचं पोलीस तपासात समोर आलं.

आणखी वाचा-व्याजासाठी तरुणाला जीवे मारण्याची धमकी; तीन सावकारांविरुद्ध गुन्हा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वाकड पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर त्याच्या मित्राकडे चौकशी केली असता दिनेश दशरथ कांबळे हा १५ मार्च २०२३ मध्ये आरोपी मित्र सिद्धांत आणि प्रतीक यांच्यासोबत काळेवाडी येथील मैदानावर मद्यपान करण्यासाठी बसले होते. दिनेश ने मद्यपाणाच्या नशेमध्ये प्रतीक रमेश सरवदे याच्या पत्नीबद्दल अश्लील भाषा वापरली याच रागातून दिनेशच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू घालून जखमी केले. यानंतर जखमी असलेल्या दिनेशला दोघांनी मोपेड दुचाकीवरून पुणे- मुंबई जुन्या महामार्गावरील नाशिक फाटा येथे आणून पुलावरून थेट पुणे- मुंबई जुन्या महामार्गावर फेकून दिले. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. अनेक वाहन त्याच्या अंगावरून गेली. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. अखेर सहा महिन्यांनी आरोपींचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले आहे. ही कामगिरी वरिष्ठ पोलिस निरीक्षक गणेश जवादवाड यांच्या टीम ने केली आहे.