पुणे : नातेसंबंधातील प्रेमप्रकरणाला विरोध करण्यात आल्याने गावाहून पळून आलेल्या तरुणाने प्रेयसीचा खून करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हडपसर भागातील एका हॉटेलमध्ये ही घटना घडली. मोनिका कैलास खंडारे (वय २४) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. तिचा चादरीने गळा आवळून खून करण्यात आला. तिचा खून करून प्रियकर आकाश अरुण खंडारे (वय ३०) यानेही गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहायक पोलीस निरीक्षक उमेश रोकडे यांनी फिर्याद दिली आहे.

हेही वाचा >>> कल्याणीनगर अपघात खटला जलदगती न्यायालयात? पोलिसांकडून हालचाली; विशेष सरकारी वकिलांच्या नियुक्तीची मागणी करणार

दोघेजण गावाहून पळून पुण्यात आले होते. हडपसर भागातील मांजरी-मुंढवा रस्त्यावरील स्पॉटलाइट हॉटेलमध्ये दोघांनी खोली भाड्याने घेतली होती. आकाशने १३ मे रोजी मध्यरात्री मोनिकाचा चादरीने गळा आवळून खून केला. त्यानंतर त्याने खोलीतील पंख्याला चादर बांधून गळफास घेतला. दोघेजण मृतावस्थेत सापडल्याची माहिती हाॅटेलमधील कर्मचाऱ्यांनी पोलिसांना दिली. सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी राख, हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे, गुन्हे शाखेचे निरीक्षक उमेश गिते यांनी घटनास्थळी भेट दिली.

पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. पोलिसांनी कुटुंबीयांची चौकशी केली आहे. मोनिका आणि आकाशचे प्रेमसंबंध होते. दोघेही नात्यातील आहेत. प्रेमसंबंधाला विरोध झाल्याने दोघेजण पुण्यात पळून आले होते. पोलीस निरीक्षक गिते तपास करत आहेत.

हेही वाचा >>> निकाल पहिल्यापासूनच ठरला होता! राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या आधीही आत्महत्येचा प्रयत्न

मोनिका आणि आकाश मूळचे अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यात असलेल्या कसुरा गावचे रहिवासी आहेत. दोघांचे नातेसंबंध असून, त्यांचे प्रेमसंबंध होते. मोनिका आणि आकाशच्या प्रेमसंबंधाला कुटुंबीयांचा विरोध होता. आकाश शेती करीत होता, तर मोनिका नोकरी करीत होती. त्यांच्या प्रेमप्रकरणाला विरोध होत असल्याने त्यांनी यापूर्वीही आत्महत्येचा प्रयत्न केला होता.