पुणे / शिरुर : कौटुंबिक वादातून माजी सैनिकाने पत्नी आणि सासूवर गोळीबार केल्याची घटना मंगळवारी सकाळी शिरुरमधील पाटबंधारे विभागाच्या आवारात घडली. गोळीबारात सैनिकाच्या पत्नीचा मृत्यू झाला असून या प्रकरणी सैनिकासह त्याच्या भावाला ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे.

मंजुळा दीपक ढवळे उर्फ मंजुळा रंगनाथ झांबरे (रा. वाडेगव्हाण, ता. पारनेर, जि. अहमदनगर) असे मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी पती दीपक पांडुरंग ढवळे आणि त्याचा भाऊ संदीप (दोघे रा. अंबरनाथ, जि. ठाणे) यांना अटक करण्यात आली. दीपक ढवळे माजी सैनिक आहे. दीपक आणि त्याची पत्नी मंजुळा यांच्यात कौटुंबिक वाद होता. त्याच्या पत्नीने शिरुर न्यायालयात पोटगी मिळण्यासाठी अर्ज केला होता. मंगळवारी (७ जून) सकाळी मंजुळा आणि तिची आई शिरुर न्यायालयात गेल्या होत्या. आरोपी दीपक आणि त्याचा भाऊ संदीप अंबरनाथहून रिक्षातून शिरुर न्यायालयात गेले होते.

शिरुरमधील पाटबंधारे विभागाच्या कार्यालयात मंजुळा आणि तिची आई थांबली होती. त्या वेळी आरोपी दीपक आणि त्याचा भाऊ संदीप तेथे आले. दीपकने त्याच्याकडील पिस्तुलातून मंजुळा आणि तिच्या आईवर गाेळीबार केला. गाेळीबारात मंजुळा आणि तिची आई गंभीर जखमी झाल्या. गोळीबाराचा आवाज ऐकून नागरिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. रांजणगाव पोलीस तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पसार होण्याच्या तयारीत असलेला दीपक आणि त्याचा भाऊ संदीपला ताब्यात घेतले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गंभीर जखमी झालेल्या मंजुळाचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाला. तिच्या आईवर शिरुरमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आरोपी दीपककडे पिस्तुल बाळगण्याचा परवाना असल्याची माहिती पोलिसांनी दिली.