पुणे : शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास ३० ते ३५ टक्के परतावा मिळण्याचे आमिष दाखवून अनेकांची एक कोटी २१ लाख ९८ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी धायरी येथील ३४ वर्षीय तरुणाने दिलेल्या फिर्यादीवरून नांदेड सिटी पोलीस ठाण्यात गुजरातमधील दहा आरोपींविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रियांक दवे, अभयकुमार दवे, मित दवे, सुमित बोराणा, झील जैन, आयुष सेवक, जय पटेल, पंकज जैन, पिंटू जानी आणि निकुंज जानी (रा. लुणावडा आणि गोध्रा, गुजरात) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेअर बाजारात मोठा परतावा मिळण्याचे आमिष दाखवून आरोपींनी तक्रारदाराकडून रोखीने आणि ऑनलाइन स्वरुपात ३३ लाख ७९ हजार रुपये घेतले. ही रक्कम आरोपींच्या विविध बँक खात्यांमध्ये जमा करण्यात आली होती. आरोपींनी सुरुवातीला काही महिने तक्रारदाराला ३० ते ३५ टक्के परतावा दिला. दरम्यान, तक्रारदाराच्या ओळखीतील इतर लोकांकडूनही शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली ८८ लाख १९ हजार रुपये घेऊन आरोपींनी आपल्या खात्यामध्ये जमा केले. मात्र, सप्टेंबर २०२४ नंतर कोणताही परतावा दिला गेला नाही. त्याचप्रमाणे मूळ गुंतवणूक रक्कमही परत केली गेली नाही. गुंतवणुकीची रक्कम परत देण्यात येईल, असे भासवण्यासाठी आरोपींनी बनावट कागदपत्रेही तयार केली.
तक्रारदार आणि त्याच्या परिचितांनी गुजरातला जाऊन आरोपींची प्रत्यक्ष भेट घेत गुंतवणुकीच्या रकमेबाबत विचारणा केली. मात्र, ‘पुन्हा पैसे मागितलेस तर जिवंत सोडणार नाही,’ अशी धमकी आरोपींनी दिली, असे तक्रारीमध्ये नमूद करण्यात आले आहे.