पिंपरी : वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण ताजे असतानाच पती, सासू, दीर, सासरे यांच्याकडून पैशांसाठी छळ करून मारहाण करण्यात आल्याच्या तक्रारीची महिला आयोगाकडून दखल घेण्यात आली नसल्याचा आरोप एका विवाहितेने केला आहे. ‘विवाहात मोटार, १५ तोळे सोने, तसेच महागड्या वस्तू देऊनही पैशांसाठी पती, सासू, दीर, मावस सासू, सासऱ्यांनी छळ केला. काठी, पट्टा, हाताने मारहाण करण्यात आली. मारहाणीचे पुरावे असलेला मोबाइल हिसकावून घेतला. गुन्हे मागे घेण्यासाठी धमकी दिली जात आहे. याबाबत दोन महिन्यांपूर्वी महिला आयोगाकडे तक्रार दिली. मात्र, त्याची दखल घेतली नसल्याचा दावा महिलेने पत्रकार परिषदेत केला. यावेळी महिलेचे आई-वडील उपस्थित होते.
‘याबाबत पुणे पोलीस आयुक्त कार्यालयात जाऊन ५ जानेवारी आणि १५ जानेवारी २०१८ रोजी पुन्हा तक्रार अर्ज केले. यावेळी दोन्ही कुटुंबांना एकत्रित बोलावून एकमेकांची समजूत काढून मिटवून घेण्यास सांगितले गेले. मात्र, त्यावेळी प्रकरण मिटले नाही. ३ मार्च २०१८ रोजी हिंजवडी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार अर्ज दाखल केला. अखेर २४ डिसेंबर २०१८ रोजी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर सप्टेंबर २०१८ मध्ये पतीकडून घटस्फोटाबाबत पत्र देण्यात आले आहे. तक्रार मागे घेण्यासाठी धमकी दिली जात आहे,’ असा आरोप महिलेने केला.
महिला आयोगाकडून दखल नाही
‘राज्य महिला आयोगाला ‘व्हॉटस ॲप’वर पत्र पाठवले होते. अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या स्वीय सहायकाच्या संपर्कात होते. त्यांनी वेगवेगळी कारणे सांगून तक्रारीकडे दुर्लक्ष केले.’ असा आरोप महिलेने केला.
महिला आयोगाचे दहा ‘व्हॉट्स ॲप’ क्रमांक आहेत. त्यापैकी कोणत्या क्रमांकावर तक्रार केली? अनेकदा ‘व्हॉट्स ॲप’वरील तक्रारी खोट्या असतात. त्यांनी रीतसर तक्रार करावी. कारवाई केली जाईल.- रूपाली चाकणकर, अध्यक्षा, राज्य महिला आयोग
या प्रकरणात हिंजवडीतील गुन्ह्याचा तपास झाला आहे. आरोपपत्र दाखल केले आहे. प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.- विशाल गायकवाड, पोलीस उपायुक्त, परिमंडळ दोन