पुणे : राज्यातील व्यवस्थापनशास्त्र पदव्युत्तर पदवी (एमबीए) अभ्यासक्रमाच्या सामायिक प्रवेश परीक्षेचा निकाल महिन्याभरापूर्वी जाहीर होऊनही केंद्रीय प्रवेश प्रक्रिया रखडली आहे. प्रवेश प्रक्रिया रखडल्याने विद्यार्थी-पालकांना मनस्ताप सहन करावा लागत असून, प्रवेश प्रक्रियेचा खोळंबा कशासाठी असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. दरम्यान शुक्रवारपासून नोंदणी प्रक्रिया सुरू होत असल्याची माहिती सीईटी सेलकडून देण्यात आली. राज्य सामाइक प्रवेश परीक्षा कक्षाकडून (सीईटी सेल) एमबीए सीईटीचा निकाल महिन्याभरापूर्वी, सप्टेंबरमध्ये जाहीर झाला.

एमबीए सीईटीच्या परीक्षेसाठी राज्यभरातील एक लाख तीन हजार ७४० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. निकाल जाहीर झाल्यावर आठ ते दहा दिवसांमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू होणे अपेक्षित होते. मात्र, जवळपास महिना होत आला तरी प्रवेश प्रक्रियेबाबत काहीच हालचाल झालेली नाही. त्यामुळे साधारण एक लाखांहून अधिक विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेच्या प्रतीक्षेत आहेत. निकाल जाहीर होऊन प्रवेश प्रक्रिया सुरू होत नसल्याने विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला. प्रवेश प्रक्रिया पूर्ण होण्यास साधारण महिन्याभराचा कालावधी जातो. त्यामुळे आता प्रवेश प्रक्रिया जाहीर झाल्यावर ती पूर्ण होऊन प्रत्यक्ष वर्ग कधी सुरू होणार, खासगी विद्यापीठांतील प्रवेश प्रक्रिया पूर्ण होऊन वर्ग सुरू झाले आहेत. मात्र उच्च व तंत्रशिक्षण विभाग, सीईटी सेल प्रवेश प्रक्रियेचा खोळंबा कशासाठी करत आहे, असा संताप विद्यार्थ्यांनी व्यक्त केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या संदर्भात माहितीसाठी सीईटी सेलचे आयुक्त महेंद्र वारभुवन यांच्याशी संपर्क साधला असता एमबीएची प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात येत असून शुक्रवारपासून नोंदणी सुरू होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.