scorecardresearch

अतिवृष्टीचा इशारा कायम ; मुंबई, ठाणे, पुणे, कोल्हापूर, सातारा, रत्नागिरीत पाऊस वाढणार

पावसाने जुलैच्या पहिल्याच आठवड्यापासून कोकण आणि मध्य महाराष्ट्रात जोरदार सुरुवात केली आहे.

mumbai thane rain imd report
प्रातिनिधीक फोटो

पुणे : अरबी समुद्रातून मोठ्या प्रमाणावर बाष्प येत असल्याने मुंबई, ठाण्यासह संपूर्ण कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात बहुतांश भागात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने जोर धरला आहे. या भागात नद्यांची पाणीपातळी वाढली असून, काही भागांत दरडी कोसळण्याच्या घटनाही घडल्या आहेत. विदर्भ आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस झाला आहे. गुरुवारपासून दोन ते तीन दिवस कोकण विभाग आणि पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टी (रेड ॲलर्ट) होण्याचा इशारा हवामान विभागाकडून कायम ठेवण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, पुणे, कोल्हापूर, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड आदी जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

जूनमध्ये चिंताजनक ओढ दिलेल्या पावसाने जुलैच्या पहिल्याच आठवड्यापासून कोकण आणि मध्य महाराष्ट्रात जोरदार सुरुवात केली आहे. त्यामुळे धरणांमध्ये पाणीसाठा जमा होऊ लागला आहे, त्याचप्रमाणे पेरण्यांचे प्रमाणही वाढले आहे. गेल्या दोन दिवसांपासून कोकणात काही ठिकाणी अतिवृष्टी होत आहे. कोकणात काही भागांत २०० मिलिमीटरहून अधिक पावसाची नोंद झाली आहे. मुंबई आणि ठाणे परिसरातही काही भागांत गेल्या चोवीस तासांत १८० ते २०० मिलिमीटर पाऊस झाला. पश्चिम महाराष्ट्रातही पावसाचे प्रमाण अधिक आहे. गगनबावडा, लोणावळा, महाबळेश्वर आदी भागांत चोवीस तासांत १५० ते २०० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्यामुळे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील नद्यांची पातळी वाढली आहे. घाटक्षेत्रांमध्ये दरडी कोसळण्याच्या घटनाही घडल्या आहेत.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Meteorological department issue alert for heavy rains in maharashtra pune print news zws