महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) पुणे मंडळाकडून सदनिकांसाठी ऑनलाइन सोडत काढण्यात येते. त्यानुसार सन २०१६ पासून आतापर्यंत तब्बल ३४ हजार ४९३ सदनिकांचे वितरण करण्यात आले आहे. त्याकरिता तब्बल चार लाख ५३ हजार ४७२ जणांनी म्हाडाकडे अर्ज केले होते. त्यामुळे गरजू नागरिकांचे स्वत:च्या घराचे स्वप्न पूर्ण झाले आहे. गेल्या सात वर्षात सर्वाधिक घरांसाठी सोडत पुणे मंडळातच काढण्यात आल्या आहेत.

हेही वाचा- सत्तेच्या मोहापायी शिवसेनेला काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या दावणीला बांधले; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका

म्हाडाकडून सदनिकांसाठी सोडत काढण्यात येते. बाजारभावापेक्षा कमी दरांत अत्यल्प, अल्प आणि मध्यम या गटांमधील नागरिकांसाठी ही सोडत असते. तसेच सर्वसमावेशक गृहनिर्माण योजना, पंतप्रधान आवास योजना अशा विविध योजनांमधूनही घरे उपलब्ध करून दिली जातात. या पद्धतीने सन २०१६ पासून आतापर्यंत म्हाडा पुणे मंडळाने ३४ हजार ४९३ घरांचे वितरण केले आहे. त्याकरिता चार लाख ५३ हजार ४७२ जणांनी अर्ज केले होते.
याबाबत बोलताना म्हाडा पुणे मंडळाचे मुख्याधिकारी नितीन माने पाटील म्हणाले, ‘गेल्या सात वर्षात वितरण केलेल्या सदनिकांपैकी २० टक्के सर्वसमावेशक योजनेंतर्गत येणाऱ्या ११ हजार सदनिकांची ऑनलाइन पद्धतीने सोडत काढून वितरण करण्यात आले आहे. अल्पदरानुसार (ॲन्युअल शेड्यूल रेट – एएसआर) केवळ बांधकाम खर्चामध्ये घरे मिळतात. त्यामध्ये प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. सन २०२०-२१ या करोना काळात देखील म्हाडा पुणे मंडळाकडून १५ हजार ४७७ सदनिकांचे ऑनलाइन पद्धतीने सोडत काढून वितरण करण्यात आले.’

हेही वाचा- पुणे:‘आयआयटी’तील विद्यार्थी दर्शन सोळंकीच्या आत्महत्येची चौकशीची मागणी; मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाकडून निवेदन

दरम्यान, सन २०१६ मध्ये २५७० सदनिकांचे वितरण करण्यात आले. सन २०१८ दोन टप्प्यांत ३१६८ आणि ८१२ घरे, सन २०१९ मध्ये ४७५६ आणि २४८८ घरे, सन २०२१ मध्ये ५६४७ आणि २९०८ घरे, सन २०२२ मध्ये तीन टप्प्यांत ४२३१, २८०३ आणि ५२११ घरे अशा एकूण ३४ हजार ४९३ घरांचे वितरण करण्यात आले. एकूण साडेचार लाखांपेक्षा जास्त नागरिकांनी अर्ज केले आहेत, असेही माने पाटील यांनी सांगितले.

हेही वाचा- “राहुल गांधी यांचे त्यांनी कधीही कौतुक केले नाही”, भाजपा नेतृत्वावर शरद पवारांची टीका

नव्या वर्षात ५९१५ घरांसाठी सोडत

नव्या वर्षात पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातील ५९१५ घरांची सोडत म्हाडा पुणे मंडळाकडून काढण्यात आली आहे. त्यामध्ये म्हाडाच्या विविध योजनेतील २५९४ सदनिका, २० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेंतर्गत २९९० सदनिका, पंतप्रधान आवास योजनेंतर्गत ३९६ सदनिका उपलब्ध करून दिल्या आहेत.