लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण पुणे विभागाकडून (म्हाडा) पुढील महिन्यात साडेतीन हजार घरांसाठी नव्याने सोडत काढण्यात येणार आहे. या सोडतीचा निकाल दिवाळीत जाहीर होणार असल्याने हक्काच्या घराचे स्वप्न पाहणाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे.

पुणे, पिंपरी चिंचवड, सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यातील विविध योजनेची सोडत गुरुवारी (१८ ऑगस्ट) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत जाहीर झाली. या सोडतीला मोठया प्रमाणात प्रतिसाद मिळाला. या पार्श्‍वभूमीवर दिवाळीच्या निमित्ताने पुढील महिन्यात साडेतीन हजार सदनिकांसाठी सोडत जाहीर होणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याबाबत म्हाडा पुणे विभागाचे मुख्याधिकारी नितीन माने पाटील म्हणाले, ‘गरजू नागरिकांसाठी म्हाडाकडून सोडत काढण्यात येते. आता काढलेल्या सोडतीमध्ये ५२११ सदनिकांसाठी तब्बल ७१ हजार ७४२ नागरिकांनी अर्ज केले होते. गेल्या काही सोडतींपेक्षा यंदा प्रतिसाद खूप मोठ्या प्रमाणात मिळाला. सदनिकांच्या संख्येच्या तुलनेत अर्जांचे प्रमाण दहा ते बारा पटीने जास्त आहे. यावरून नागरिकांना घरांची गरज असल्याने म्हाडाकडून सप्टेंबर महिन्यात साडेतीन हजार सदनिकांसाठी सोडत काढण्यात येणार आहे. या सोडतीचा निकाल दिवाळीमध्ये जाहीर करण्यात येणार आहे.’