पुणे :  एमआयटी विश्वशांती विद्यापीठाने काश्मीरच्या पत्रकार सफिना नबी यांना जाहीर केलेला पुरस्कार रद्द केला. राजकीय दबावातून हा पुरस्कार रद्द करण्यात आल्याचा आरोप पुरस्कारार्थी, निवड समिती सदस्याने केला आहे. पुरस्कार रद्द केल्यामुळे तीन परीक्षकांनी कार्यक्रमाला उपस्थित न राहण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, अंतर्गत विसंवादामुळे हा प्रकार घडल्याचे स्पष्टीकरण विद्यापीठाकडून देण्यात आले.

एमआयटी विश्वशांती विद्यापीठाच्या स्कूल ऑफ मीडिया अँड कम्युनिकेशनतर्फे पाचव्या राष्ट्रीय माध्यम व पत्रकारिता परिषदेच्या निमित्ताने सफिना नबी यांना ‘जर्नालिझम फॉर पीस अ‍ॅवॉर्ड’ हा पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. पुरस्कार प्रदान कार्यक्रम बुधवारी  पुण्यात होणार होता. मात्र  मंगळवारी हा पुरस्कार रद्द करण्यात आल्याचे सफिना यांना कळवण्यात आले. सफिना यांनी काश्मीरमधील महिलांना मालमत्तेमध्ये हक्क मिळत नसल्याचा विषय त्यांच्या बातमीतून मांडला होता. 

हेही वाचा >>>कारागृहातील मित्राला जामीनावर बाहेर काढण्यासाठी घरफोडीचे गुन्हे; पुणे, सातारा शहरात घरफोड्या, १२ लाखांचा ऐवज जप्त

सफिना नबी म्हणाल्या, की पुरस्कारासाठी मी अर्ज केलेला नव्हता. प्रतिष्ठित परीक्षकांच्या समितीने पुरस्कारासाठी माझी निवड केल्याचे एमआयटी विश्वशांती विद्यापीठाकडून मला कळवण्यात आले. मात्र अचानक मंगळवारी पुरस्कार रद्द केल्याचे संस्थेकडून दूरध्वनीद्वारे कळवण्यात आले.

हेही वाचा >>>“अश्विनी जगताप यांना गैरसमज झाला होता, त्यांना…”, भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांचे स्पष्टीकरण

ज्येष्ठ पत्रकारांकडून नाराजी

ज्येष्ठ पत्रकार विनिता देशमुख यांना परिषदेतील एका सत्रात बोलण्यासाठी निमंत्रित करण्यात आले होते. मात्र पुरस्कार रद्द केल्याचा प्रकार समजल्यावर त्यांनीही सहभागी न होण्याचा निर्णय घेतला.  हा निर्णय सफिना यांच्यासाठी अन्यायकारक आहे, तसेच पूर्वग्रहदूषित, राजकीय दबावापुढे झुकणारा आहे. विश्वशांती आणि बंधु्त्वाचा प्रचार करणाऱ्या डॉ. विश्वनाथ कराड यांच्या संस्थेकडून असे घडणे अपेक्षित नाही, असे त्यांनी नमूद केले.

 एमआयटी विश्वशांती विद्यापीठ पारदर्शक, अराजकीय संस्था आहे. केवळ अंतर्गत विसंवादामुळे ही दुर्दैवी परिस्थिती उद्भवली. सफिना नबी यांच्या कामाचा आदर करून अधिक मोठय़ा पुरस्कार सोहळय़ात त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे, असे स्पष्टीकरण एमआयटी विश्वशांती विद्यापीठाकडून देण्यात आले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(सफिना नबी)