पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार बापूसाहेब पठारे यांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या पदाधिकार्‍यांसह २० जणांविरूद्ध विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोहगावमधील गाथा लॉनमध्ये शनिवारी रात्री आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ही घटना घडली होती.

आमदार पठारेंच्या वाहन चालकालाही बेदम मारहाण करून त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी आणि खिशातील रोकड चोरून नेण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे पदाधिकार्‍यांसह २० जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमदार पठारे यांचे मोटार चालक शकील अजमोद्दीन शेख (रा. लोहगाव) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आमदार बापूसाहेब पठारे हे शनिवारी (४ ऑक्टोबर) रात्री सव्वा नऊच्या सुमारास लोहगावमधील गाथा लॉनमध्ये एका कार्यक्रमासाठी गेले होते. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजित पवार) पदाधिकार्‍यांसह कार्यकर्त्यांचे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) कार्यकर्त्यांशी वादविवाद झाले.

त्यावेळी आरोपींनी आमदार पठारे यांना धक्काबुक्की केली. त्यांना वाचविण्यासाठी फिर्यादी मोटार चालक शकील शेख यांनी मध्यस्थी केली. त्यावेळी टोळक्याने त्यांना बेदम मारहाण केली. त्यांच्या गळ्यातील ५० हजार रूपयांची सोनसाखळी आणि एक हजारांची रोकड चोरून नेली, असे फिर्यादीत म्हटले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोविंद जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास सुरू आहे.