महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे काढण्यासाठी आजपर्यंतची (४ मे) मुदत दिली होती. पण तरी देखील भोंगे न काढल्याने राज्यात अनेक ठिकाणी मनसे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे पोलीस या मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेत आहेत. मात्र त्याच दरम्यान मनसेचे पुणे शहाराध्यक्ष साईनाथ बाबर आणि नेते वसंत मोरे हे दोघेही आज सकाळपासून नॉट रिचेबल झाल्याचे समोर आले आहे. यावरून अनेक चर्चांना उधाण आलेले आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतील सभेत मशिदीवरील भोंगेंच्या विरोधात भूमिका जाहीर केल्यानंतर वसंत मोरे यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती.त्यानंतर त्यांना शहराध्यक्ष पद सोडावे लागले. साईनाथ बाबर यांच्याकडे राज ठाकरे यांनी शहराध्यक्ष पद सोपवलं. या दोघांच्या वॉर्डामध्ये मुस्लीम मतदार अधिक आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, १ मे रोजी औरंगाबाद मध्ये झालेल्या मनसेच्या सभेत देखील राज ठाकरे यांनी भोंग्यांचा मुद्दा लावून धरत ४ मे पर्यंतचा अल्टिमेटम दिला होता. मशिदींवरी भोंग काढले नाहीत तर मशिदींसमोर हनुमान चालिसा पठण केले जाईल, असा इशारा राज ठाकरेंनी दिला होता. त्यानुसार आज सकाळपासूनच राज्यात मनसे कार्यकर्ते रस्त्यावर उतरल्याचे दिसून आले. यावर मनेसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना पोलिसांकडून ताब्यात घेण्याची कारवाई सुरू झाली. या सर्व घडामोडी दरम्यान पुण्यातील अजय शिंदे आणि हेमंत संभूस यांना देखील पोलिसानी ताब्यात घेतले. परंतु यामध्ये शहराध्यक्ष साईनाथ बाबर आणि वसंत मोरे कुठेच दिसले नाहीत. त्या दोघांचे फोन देखील स्वीच ऑफ आहेत. हे दोघे नॉट रिचेबल असल्याने नव्या चर्चांना उधाण आलं आहे. आता हे दोघे समोर येऊन नेमकी काय भूमिका मांडतात हे पाहावे लागणार आहे.