पुणे : Maharashtra Weather Forecast देशात उशिराने दाखल झालेल्या आणि पोषक वातावरणाअभावी रेंगाळलेल्या मोसमी वाऱ्यांनी रविवारी वेगाने प्रगती केली. गुजरात आणि राजस्थानमधील काही भागांचा अपवाद वगळता देशाचा बहुतेक भाग मोसमी वाऱ्यांनी व्यापला आहे. मोसमी पावसासाठी पोषक वातावरण असून, पुढील पाच दिवस देशभरात चांगला पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाचे अतिरिक्त महासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी व्यक्त केला आहे.

होसाळीकर म्हणाले, गेल्या २४ तासांत वेगाने वाटचाल करीत मोसमी वाऱ्यांनी एकाच दिवसात पुणे, मुंबई, दिल्लीत हजेरी लावली आहे. बंगालच्या उपसागराच्या उत्तरेला कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. अरबी समुद्रात गुजराच्या किनाऱ्यावर वाऱ्याची चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे पुढील चार-पाच दिवस चांगल्या पावसाची शक्यता आहे. पश्चिम किनारपट्टी, पूर्व किनारपट्टी आणि मध्य भारतात पुढील चार-पाच दिवस चांगला पाऊस अपेक्षित आहे. राज्यभरात १५ जून रोजी सक्रिय होणारा मोसमी पाऊस यंदा २५ जून रोजी सक्रिय झाला आहे. आकाशात ढगांची दाटी झालेली दिसत असून, सर्वदूर चांगला पाऊस अपेक्षित आहे.

हेही वाचा >>> पुण्यात पहिल्याच पावसात पावसाळापूर्व कामांवर ‘पाणी’; महापालिकेचा कारभार चव्हाट्यावर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राज्यात पावसाचा इशारा

रायगड, रत्नागिरी, गोंदिया, नागपूरला केशरी (ऑरेंज) इशारा देण्यात आला असून, मुसळधार पावसाची शक्यता आहे. पालघर, सिंधुदुर्ग, ठाणे आणि मुंबईला पिवळा इशारा देण्यात आला असून, चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोल्हापूर, सातारा, नाशिक, परभणी, नांदेड, गडचिरोली, चंद्रपुरात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. राज्याच्या अन्य जिल्ह्यांत हलक्या पावसाची शक्यता आहे.