पुणे : यंदा चांगला पाऊस झाल्याने माेसंबीेच्या लागवड क्षेत्रात वाढ झाली आहे. हैद्राबादमधील मोसंबीचा हंगाम अखेरच्या टप्यात असताना छत्रपती संभाजीनगरमधील मोेसंबीचा हंगाम सुरू झाला आहे. त्यामुळे बाजारात मुबलक प्रमाणात मोसंबी उपलब्ध झाली आहे. किरकोळ बाजारात ६० ते ८० रुपये किलो दराने विक्री करण्यात येत आहे.
आंबट-गोड चवीच्या माेसंबीचा हंगाम सुरू झाला आहे. छत्रपती संभाजीनगर भागात माेसंबीची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. छत्रपती संभाजीनगरमधील मोेसंबीचा हंगाम सुरू झाला असून, रविवारी बाजारात १५ ते २० टन मोसंबींची आवक झाली. यंदा छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर भागात चांगला पाऊस झाल्याने माेसंबीची लागवड चांगली झाली आहे. त्यामुळे नवीन बहरातील मोसंबी मुबलक प्रमाणावर उपलब्ध राहणार आहे, अशी माहिती श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील मोसंबी व्यापारी सोनू ढमढेरे यांनी दिली.
घाऊक बाजारात तीन डझन मोसंबीला १६० ते २६० रुपये, तसेच चार डझनास (आकाराने लहान मोसंबी) ४० ते १३० रुपये दर मिळाले. किरकोळ बाजारात ६० ते ८० रुपये दराने विक्री केली जात आहे. छत्रपती संभाजीनगर, तसेच हैद्राबाद परिसरातून मोसंबीची आवक होत आहे. येत्या पंधरा दिवसात मोसंबीची आवक आणखी वाढेल. श्रावण महिन्यात मोसंबीच्या मागणीत वाढ होते.
पुण्यातील घाऊक बाजारातून सांगली, सातारा, कोल्हापूर येथील बाजारात मोसंबी विक्रीस पाठविली जात आहे. कर्नाटक, गोव्यातील विक्रेत्यांकडून मोसंबीच्या मागणीत वाढ झाली आहे, असे ढमढेरे यांनी नमूद केले.
पाऊस चांगला झाल्याने छत्रपती संभाजीनगर परिसरातील माेसंबीच्या लागवड क्षेत्रात वाढ झाली आहे. यंदा ८० ते १०० टक्के उत्पादन मिळण्याची शक्यता आहे. नवीन बहरातील मोसंबीची गोडी कमी आहे. हैद्राबादमधील जुन्या बहरातील मोसंबीची गोडी चांगली आहे. हैद्राबादमधील मोसंबीचा हंगाम अखेरच्या टप्यात आहे. पंधरा दिवसात छत्रपती संभाजीनगरमधून मोसंबीची आवक आणखी वाढेल. आवक वाढल्यानंतर दरही कमी होतील. – सोनू ढमढेरे, मोसंबी व्यापारी, श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड.