राज्यातील गुन्हेगारीला सरकार जबाबदार
पिंपरी-चिंचवड : ठाकरे ब्रँडला कुणीही संपवू शकत नाही. कुठलीही ताकद संपवू शकणार नाही. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचं देशासाठी आणि राज्यासाठी मोठं योगदान राहिलेलं आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर त्यांचं स्वागत करते, असे उद्गार खासदार सुप्रिया सुळे यांनी काढले आहेत. खासदार सुप्रिया सुळे हिंजवडीमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होत्या.
सुप्रिया सुळे म्हणाल्या, ठाकरे कुटुंबाचं मोठं योगदान आहे. ठाकरे हे केवळ आडनाव नाही. शिवसेनेतील प्रत्येक कार्यकर्ता हा ठाकरे आहे. मोठ्या विश्वासाने आणि शून्यातून त्यांनी शिवसेना उभी केलेली आहे. त्यांच्या कुटुंबातील दोन सदस्य एकत्र येत असतील तर त्यांचं मनापासून स्वागत आहे. काहीतरी गोष्टी मनापासून केल्या पाहिजते, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. त्या पुढे म्हणाल्या, यश, अपयश प्रत्येकाच्या आयुष्यात येत असतं.
स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचं देशासाठी आणि राज्यासाठी योगदान राहिलेलं आहे. जेव्हा केव्हा इतिहास लिहिला जाईल तेव्हा याचा उल्लेख होईल. त्यांचं योगदान कुणीही संपवू शकत नाही. कुठलीही ताकद संपवू शकत नाही. यावेळी सुप्रिया सुळे यांनी राज्यातील गुन्हेगारीबाबत राज्य सरकारला दोषी धरलं आहे. राज्यातील गुन्हेगारी ही राज्य सकारमुळे वाढल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
खासदार सुप्रिया सुळेंचा सरकारला इशारा
खासदार सुप्रिया सुळे यांनी आज हिंजवडी येथे रस्त्याची पाहणी केली. रस्त्याची दुरावस्था झाल्यामुळे त्यांनी राज्य सरकारवर आरोप केला आहे. विकासकामांमध्ये कुठलेही राजकारण करणार नाही. सरकारने या दुरावस्थेकडे लक्ष द्यावे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे हिंजवडीतील प्रश्नांबाबत वारंवार वेळ मागितली आहे. पत्रव्यवहार केलेला आहे.
२६ जुलैपर्यंत ही परिस्थिती सुधारली नाही, तर आंदोलन करण्याचा इशारा राज्य सरकारला सुप्रिया सुळे यांनी दिला आहे. वेळीच परिस्थिती सुधारली तर संबंधित शासकीय अधिकाऱ्यांचा हिंजवडीत येऊन सत्कार करेन असंदेखील सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. हिंजवडी ग्रामपंचायतीला पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत समाविष्ट करा किंवा इतर पर्याय निवडा याबद्दल काहीही म्हणणं नाही. परंतु, हिंजवडीचा विकास झाला पाहिजे, असं सुळे यांनी सांगितलं. हिंजवडी ग्रामपंचायत पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत समाविष्ट करण्याबाबत नागरिकांचे मत महत्त्वाचं असल्याचेदेखील त्यांनी अधोरेखित केलं.