शून्य ते ३० युनिट वीजवापर संशयास्पद? ; राज्यात ४३ लाख ग्राहक महावितरणच्या तपासणी कक्षेत

सदोष मीटर तातडीने बदलण्याची कार्यवाही केली जात आहे

पुणे : वीज ग्राहकाच्या मीटरमध्ये शून्य ते ३० युनिटपर्यंतच वीजवापर होत असल्यास त्याबाबत शंका व्यक्त करून महावितरणकडून मीटर तपासणीची मोहीम राबविण्यात येत आहे. राज्यात असे सुमारे ४३ लाख ग्राहक महावितरणच्या तपासणी कक्षेत असून, त्यातील काहींच्या मीटरची तपासणी झाली असून, त्यात काही प्रकरणांत मीटरमधील दोष आणि चोरीच्या उद्देशाने फेरफारही समोर येत आहेत. सदोष मीटर तातडीने बदलण्याची कार्यवाही केली जात आहे. त्यातून अनपेक्षित वीजगळती समोर येऊन महावितरणच्या महसुलात भर पडण्यास मदत होत आहे.

 वीज देयकांची कोटय़वधींची थकबाकी वसुलीबरोबरच बुडणाऱ्या महसुलात वाढ करण्यासाठी सध्या विविध मोहिमा राबविण्यात येत आहेत.

त्याचाच एक भाग म्हणून सुमारे तीन महिन्यांपूर्वी महावितरणचे अध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी ग्राहकांचा वीजवापर आणि महसूलवाढीसंदर्भात आढावा घेतला होता. त्यात घरगुती, वाणिज्यिक आणि औद्योगिक वर्गवारीतील ४२ लाख ९३ हजार वीजग्राहक दरमहा शून्य ते ३० युनिटपर्यंत विजेचा वापर करीत असल्याचे दिसून आले. हे ग्राहक प्रामुख्याने शहरी, निमशहरी भागातील आहेत. एवढा कमी वीजवापर असल्याने त्याची खात्री करण्यासाठी सर्व परिमंडलामध्ये वीजमीटर तपासणीची विशेष मोहीम सुरू करण्याचे आदेश सिंघल यांनी यांनी दिले होते. त्यानुसार ही मोहीम सुरू करण्यात आली आहे.

सध्या महावितरणकडून राज्यभर संशयास्पद वीजवापराच्या मीटरची तपासणी होत असून, त्यात मीटरची गती संथ असणे, मीटर बंद असणे, आकडे दर्शविण्याचा फलक बंद असणे आदी प्रकार आढळून येत आहे. या प्रकरणात तात्काळ मीटर बदलून वापरानुसार वीज देयक दले जात आहे. काही प्रकरणांत मीटरमध्ये ग्राहकांनी फेरफार केल्याचे आढळून आल्याने त्यांच्याविरुद्ध वीजचोरीचे कलम १३५ अनुसार कारवाई सुरू  करण्यात आली असल्याने महावितरणकडून सांगण्यात आले.

कमी वीज देयकांच्या तक्रारी अत्यल्प

सदोष मीटर किंवा मीटर वाचनातील दोषामुळे जादा युनिटचे देयक आल्यास त्याबाबतच्या तक्रारी ग्राहकांकडून तात्काळ होत असतात. मात्र याच कारणांनी कमी युनिटचे देयक आल्यास अशा तक्रारी करण्याचे प्रमाण अत्यल्प असल्याचे महावितरणकडून सांगण्यात येत आहे. मीटर बदलून दिल्यास मागील वीजवापराच्या युनिटचे नियमानुसार समायोजन केले जात असून, वाचन सदोष असल्यास संबंधित संस्थेविरुद्ध तात्काळ कारवाई करण्यात येत असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.

साडेचार लाख युनिटचा महसूल

संशयास्पद वीजवापराबाबत सुरू असलेल्या मोहिमेत मीटर वाचनातील अनियमितता दूर होऊन एकटय़ा पश्चिम महाराष्ट्रात एकाच दिवसात ४ लाख ५६ हजार युनिटचा म्हणजेच ५० लाखांहून अधिकचा महसूल महावितरणला मिळाला. याच दिवशी पुणे, कोल्हापूर, सोलापूर, सातारा, सांगली जिल्ह्य़ांत १४१८ ठिकाणी एक कोटी २८ लाखांचा अनधिकृत वीजवापरही उघडकीस आला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Msedcl conducts meter inspection campaign to check the reading zws

Next Story
उसने पैसे वेळेत न दिल्यामुळे अंगावर अ‍ॅसिड टाकले
ताज्या बातम्या