पिंपरी- चिंचवड : सोनसाखळी हिसकावणाऱ्या टोळीला पिंपरी- चिंचवड गुन्हे शाखा युनिट तीन च्या पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. आरोपींकडून १२ लाखा ३१ हजारांचे १० तोळे सोन्याचे दागिने पोलिसांनी जप्त केले आहेत. अहिल्यानगरमधील सुपा येथे सोनसाखळी हिसकावताना मे महिन्यात महिलेचा रस्त्यावर पडून मृत्यू झाला होता. असे एकूण वेगवेगळे १५ गुन्हे उघडकीस आले आहेत.
याप्रकरणी अक्षय राजू शेरावत, ऋषी बुद्धिमान नानावत, अरमान प्रल्हाद नानावत आणि सोनू फिरोज गुडदावत यांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. चोरीतील सोनसाखळी, सोन्याचे दागिने विकत घेणारा सराफ खुशालसिंग जोधसिंगराव ला देखील पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चार ही आरोपी हे पादचारी एकट्या महिलेला हेरून तिच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून पळ काढत असायचे. आत्तापर्यंत पुणे ग्रामीण, अहिल्यानगर, पिंपरी- चिंचवड परिसरात सोनसाखळी हिसकावल्याचे गुन्हे उघडकीस आले आहेत. दरम्यान, २० मे २०२५ रोजी अहिल्यानगर सुपा येथे आरोपी अक्षय आणि ऋषी नानावत यांनी महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावताना महिला रस्त्यावर पडून गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला होता. या प्रकरणी दोघांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल आहे. त्यांना सुपा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलं आहे. चार ही आरोपींना म्हाळुंगे परिसरातून बेड्या ठोकण्यात आल्या. ही कामगिरी पोलीस उपायुक्त शिवाजी पवार, सहाय्यक पोलीस आयुक्त विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम यांच्या टीमने केली आहे.