हॉटेल पार्किंग मधील गाडी काढण्यावरुन झालेल्या वादात चौघा जणांनी सेवानिवृत्त पोलीस महानिरीक्षकाच्या मुलाला बेदम मारहाण करुन त्याचा खून केल्याचा प्रकार समोर आला आहे.  नरेंद्र रघुनाथ खैरे (वय ३३, रा. आंबेगाव बु.) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. 

युवराज जंबु कांबळे, ओंकार अशोक रिठे, वैभव पोपट अदाटे, मनोज दत्तात्रय सूर्यवंशी, विष्णु कचरुन कदम (रा. नर्‍हे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. 

याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक आशिष रमेश कवठेकर यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना  साई विश्व सोसायटी, न्यू प्यारा बार समोरील पार्किंगच्या जागेत घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी संगनमत करुन पार्किंगमधील गाडी काढण्याचे कारणावरुन नरेंद्र खैरे यांना बेदम मारहाण केली.  त्यानंतर तिघा जणांनी त्याला उचलून श्री साई मोटर्स येथे ठेवून दिले. चारही आरोपींनी नरेंद्र खैरे याच्या खिशातील पाकीट, मोबाईल, हेडफोन इत्यादी वस्तू चोरुन नेल्या.

मंगळवारी सकाळी श्री साई मोटर्स येथे एक मृतदेह आढळून आल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यावर पोलीस घटनास्थळी पोहचले. त्यांनी तेथील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केल्यावर त्यांना या सर्व प्रकारचा उलघडा झाला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर तपास करीत आहेत. 

रघुनाथ खैरे हे राज्य पोलिस दलातील वरिष्ठ पोलीस अधिकारी आहेत. ते राज्य गुन्हे अन्वेषण विभागात कार्यरत असताना पोलीस महानिरीक्षक म्हणून निवृत्त झाले आहेत.