मुसेवाला हत्या प्रकरणी पिस्तुलासाठी संतोष जाधवला फरार दोघांची मदत

पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला हत्या प्रकरणातील संशयित आणि ओंकार बाणखेले खून प्रकरणातील मुख्य आरोपी संतोष सुनील जाधव याच्या सांगण्यावरून त्यांच्या साथीदारांनी मध्यप्रदेशातून पंधरा पिस्तुले आणली.

मुसेवाला हत्या प्रकरणी पिस्तुलासाठी संतोष जाधवला फरार दोघांची मदत
दिवंगत पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला

पुणे : पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला हत्या प्रकरणातील संशयित आणि ओंकार बाणखेले खून प्रकरणातील मुख्य आरोपी संतोष सुनील जाधव याच्या सांगण्यावरून त्यांच्या साथीदारांनी मध्यप्रदेशातून पंधरा पिस्तुले आणली. त्यासाठी त्यांना फरार असलेले जॅक उर्फ अमित पंडित आणि हनुमान उर्फ सचिन बिश्नोई यांनी मदत केल्याचे पोलिस तपासात समोर आले असल्याची माहिती विशेष सरकारी वकील विजय फरगडे यांनी न्यायालयाला दिली. 

या प्रकरणात पोलीस कोठडीची मुदत संपल्याने जाधव याला गुरूवारी विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. युक्तिवादादरम्यान अ‍ॅड. फरगडे म्हणाले, मंचर पोलीस ठाण्यातील खुनाच्या गुन्ह्यात पोलीस कोठडीत असताना जाधव याने गुन्ह्यातील फिर्यादीकडे ५० हजार रुपयांचा हप्ता मागण्यासाठी नहार, थोरात आणि जाधव याला पाठविले होते. तसेच, जयेश रतिलाल बहिरम आणि गणेश सुरेश तारू यांनी संतोष जाधव याच्या सांगण्यावरून मध्यप्रदेशातून पंधरा पिस्तुले आणली. त्यानंतर, बहिरम याने आपल्याजवळ एक पिस्तूल ठेवत त्यापैकी पाच पिस्तुलांचे साथीदारांना वाटप केले. यामध्ये, रोहित तिटकारे याला दिलेल्या चारपैकी तीन पिस्तुले त्याने वैभव तिटकारे याला दिले होते. ते घराच्या झडतीदरम्यान जप्त करण्यात आले आहे. गुन्हा करण्याच्या एक महिन्याअगोदर आरोपी हे वैभव तिटकारे याच्या घरी एकत्र भेटल्याचे तपासादरम्यान समोर आले आहे. 

आरोपीला मध्यप्रदेश येथे नेऊन सखोल तपास करायचा आहे. सध्या फरार असलेले पंडित आणि बिश्नोई यांबाबत जाधव याकडे तपास करायचा आहे. गुन्हा केल्यानंतर जाधव हा राजस्थान, गुजरात येथे वास्तव्याला होता. यादरम्यान त्याला कोणी आश्रय दिला तसेच आर्थिक मदत केली याचा तपास करायचा आहे. जाधव बिश्नोई टोळीशी संबंधित असल्याने त्याने टोळीशी संबंधित काही गुन्हे केले आहेत का तसेच जाधव व त्याच्या साथीदाराविरुध्द पुणे ग्रामीण, ठाणे जिल्ह्यात मालमत्तेविरुध्दचे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत, या स्वरुपाचे त्यांनी इतर ठिकाणी गुन्हे केले आहेत का याचा तपास करायचा आहे.  त्यांनी गुन्हेगारीमधून अवैधरित्या कमावलेल्या स्थावर व जंगम मालमत्तेचा शोध घेऊन ती पुराव्याच्या अनुषंगाने जप्त करायची असल्याने त्याच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची मागणी अ‍ॅड. फरगडे यांनी केली. न्यायालयाने ती मान्य करत त्याच्या पोलीस कोठडीत १४ दिवसांची वाढ केली. 

पूर्ववैमनस्यातून समाजमाध्यमांवर एकमेकांना ठार करण्याच्या धमक्यांचे स्टेटस ठेवल्याच्या कारणातून गेल्या वर्षी एक ऑगस्टला एकलहरे (ता. आंबेगाव) गावातील ओंकार बाणखेलेचा गोळ्या झाडून खून करण्यात आला होता. या प्रकरणात संतोष जाधवसह १४ आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यानुसार (मकोका) मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणात आत्तापर्यंत नऊ जणांना अटक करण्यात आली असून सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
सलग दुसऱ्या दिवशी धरणांमध्ये मुसळधार पाऊस कायम;  धरणक्षेत्रांत महिनाभराचा पाणीसाठा जमा
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी