पुणे : रिक्षाचालकाला धमकावून दरमहा दोन हजार रुपयांचा हप्ता मागणाऱ्या सराइताला नांदेड सिटी पोलिसांनी गजाआड केले.सागर चरेकर (वय ३५, रा. जाधवनगर, रायकर मळा, धायरी) असे अटक केलेल्या सराइताचे नाव आहे. या प्रकरणी चरेकरसह दोन साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत रिक्षाचालक सुनील नीळकंठ सुबाने (वय ३०, रा. शांतीबन सोसायटी, रायकरमळा, धायरी) यांनी नांदेड सिटी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रिक्षाचालक सुबाने हे धायरीतील जाधवनगर परिसरातील थांब्यावर १४ सप्टेंबर रोजी रात्री थांबले होते. त्यावेळी चरेकर आणि साथीदार तेथे आले. या भागात रिक्षा चालवायची असेल, तर दरमहा दोन हजार रुपये हप्ता द्यावा लागेल, अशी धमकी रिक्षाचालक सुबाने यांना दिली. रायकर मळा भागात पुन्हा आल्यास जिवे मारू, अशी धमकी आरोपींनी दिली. सुबाने यांनी घाबरून त्यांना शंभर रुपये देऊ केले. तेव्हा आरोपींनी त्यांना मारहाण करुन खिशातील ५०० रुपये काढून घेतले.

या घटनेनंतर सुबाने घाबरले होते. त्यांनी नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानंतर पाेलिसांनी चरेकर याला अटक केली. त्याच्याबरोबर असलेल्या साथीदारांचा शोध घेण्यात येत आहे. चरेकरविरुद्ध मारामारीचे गुन्हे दाखल आहेत. त्याच्याविरुद्ध यापूर्वी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती. रिक्षाचालकाला खंडणी मागितल्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली, असे नांदेड सिटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल भोस यांनी सांगितले.