पुणे : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणात केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडून (सीबीआय) अंतिम युक्तिवादास सुरुवात करण्यात आली आहे.

डॉ. दाभोलकर हत्याप्रकरणाची सुनावणी विशेष न्यायाधीश पी. पी. जाधव यांच्या न्यायालयात सुरू आहे. सीबीआयचे विशेष सरकारी वकील ॲड. प्रकाश सूर्यवंशी यांनी मंगळवारी अंतिम युक्तिवादास सुरुवात केली. डॉ. दाभोलकर अनिष्ठ प्रथा आणि अंधश्रद्धा निर्मूलनासाठी काम करत होते. आरोपींनी त्यांच्यावर पिस्तुलातून गोळ्या झाडून खून करून अंधश्रद्धा निर्मूलनासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये दहशत निर्माण केली. आरोपींविरुद्ध बेकायदा शस्त्र बाळगणे, तसेच बेकायदा हालचाली प्रतिबंध कायद्यान्वये (यूएपीए) कारवाई करण्यात आली होती. आरोपींवर दाखल केलेला गुन्हा सिद्ध होतो. या खटल्यातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांनी आरोपींना न्यायालयात ओळखले आहे, अशी माहिती सीबीआयच्या वतीने न्यायालयात देण्यात आली.

हेही वाचा…पुण्यातील सार्वजनिक स्वच्छतागृहांचेही आता खासगीकरण?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

डॉ. दाभोलकर यांचे पुत्र डॉ. हमीद दाभोलकर, अंनिसचे कार्यकर्ते प्रशांत पोतदार आणि कोल्हापूर येथील व्यावसायिक संजय साडविलकर यांच्या साक्षीतून सनातन संस्था आणि आरोपी तावडे यांच्या मनात दाभोलकरांविषयी शत्रुत्वाची आणि द्वेषाची भावना होती, हे सिद्ध झाले आहे. त्यांच्यावर गोळ्या झाडणारे आरोपी सचिन अंधुरे आणि शरद कळसकर यांना दोन प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांनी छायाचित्रासह न्यायालयात ओळखले आहे. आरोपी अंधुरे याने गुन्हा केल्याचा अतिरिक्त न्यायालयीन कबुलीजबाब दिला आहे. दाभोलकरांवर गोळ्या झाडण्यासाठी आरोपींनी वापरलेले पिस्तूल जप्त झाले नाही. मात्र, प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांनी पिस्तुलातून गोळीबार झाल्याचे सांगितले आहे. दाभोलकरांच्या मृतदेहातून दोन गोळ्या बाहेर काढण्यात आल्याचे ससून रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अजय तावरे यांनी न्यायालयात सांगितले आहे. त्यामुळे गोळीबार झाल्याचे सिद्ध होते, असे ॲड. सूर्यवंशी यांनी युक्तिवादात सांगितले.

हेही वाचा…पिंपरी: दागिन्याबाबत विचारल्याने मुलाने केले आईवर चाकूने वार

खटल्याची पुढील सुनावणी १७ फेब्रुवारी रोजी होणार आहे. सरकारी वकील ॲड. सूर्यवंशी बचाव पक्षाच्या युक्तिवादावर म्हणणे मांडणार आहेत. सरकार पक्षाचा युक्तिवाद पूर्ण झाल्यावर बचाव पक्षाकडून अंतिम युक्तिवादास सुरुवात करण्यात येणार आहे.