कोणीतरी दाखविलेल्या अनास्थेमुळे दुर्मिळ ठेवा असलेले हस्तलिखित पदपथावरील कचऱ्यामध्ये पडले होते. मात्र, हे बाड ज्यांना सापडले त्या भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेचे माजी ग्रंथपाल वा. ल. मंजूळ यांना सव्वाशे वर्षांपूर्वीच्या या हस्तलिखिताचे महत्त्व उमगले. ‘नवनाथ भक्तिसार’ हा ग्रंथ शुक्रवारी नाथसंप्रदायाच्या अभ्यासकाकडे सुपूर्द करण्यात आला.
विद्येचे माहेरघर, वारसा जतन करणारे शहर, सांस्कृतिक राजधानी आणि आदर्श नगर म्हणजेच ‘स्मार्ट सिटी’कडे वाटचाल करीत असलेल्या पुण्यामध्ये दुर्मिळ ग्रंथ चक्क प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये गुंडाळून रस्त्यावर फेकलेला आढळून आला. हा ग्रंथ वा. ल. मंजूळ यांना सापडला. कोथरूड परिसरातील पं. जितेंद्र अभिषेकी उद्यानासमोरील पदपथावर प्लॅस्टिकची पिशवीत हा गं्रथ रस्स्त्यावरच टाकलेला होता भुरभुरत्या पावसामध्येही फिरावयास गेलेल्या मंजूळ यांनी अर्धवट भिजलेल्या अवस्थेतील ती पिशवी उचलून घरी आणली. हस्तलिखित स्वरूपातील हा ग्रंथ साफ करून त्याची पाने जुळवून घेतली.
धुंडीसुत मालो नरहरी कृत शके १७४१ मधील ‘नवनाथ भक्तिसार’ असे या प्राचीन हस्तलिखिताचे नाव आहे. का. म. थत्ते यांनी संपादित केलेला हा ग्रंथ १८९२ मध्ये शिळाप्रेसवर छापलेला असल्याचे निदर्शनास आले. या दुर्मिळ हस्तलिखितामध्ये प्रत्येकी पाच पानांचा एक याप्रमाणे ४० अध्याय असून ग्रंथांच्या शेवटी एक रेखाचित्र आहे, अशी माहिती मंजूळ यांनी दिली. संकष्टी चतुर्थीचा मुहूर्त साधून शुक्रवारी हा ग्रंथ नाथसंप्रदायाचा अभ्यास करणाऱ्या व्यक्तीकडे सुपूर्द करण्यात आला. पुण्यातील हस्तलिखित संग्रहालयामध्ये केवळ संस्कृत ग्रंथांचे जतन केले जाते. तेथे मराठी भाषेतील ग्रंथाला फारसा वाव नाही. त्यामुळे ज्यांच्याकडे अशा स्वरूपाचे दुर्मिळ ग्रंथ आहेत ते कचऱ्यामध्ये फेकू नका. या गं्रथाविषयी कळविल्यास ते योग्य ठिकाणी पोहोचविले जातील, असे आवाहन मंजूळ यांनी केले.
संग्रहित लेख, दिनांक 31st Oct 2015 रोजी प्रकाशित
‘नवनाथ भक्तिसार’ ग्रंथाचे दुर्मिळ हस्तलिखित रस्त्यावर सापडले
धुंडीसुत मालो नरहरी कृत शके १७४१ मधील ‘नवनाथ भक्तिसार’ असे या प्राचीन हस्तलिखिताचे नाव आहे
First published on: 31-10-2015 at 03:20 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Navnath bhaktisara rare manuscript found book
