scorecardresearch

गिरीश बापटांच्या निधनाने सर्वसमावेशक नेतृत्व हरपलं, अजित पवारांनी व्यक्त केला शोक

गिरीश बापट यांच्यावर सायंकाळी पुण्यात अंत्यसंस्कार होणार आहेत.

ajit pawar girish bapat
गिरीश बापटांच्या निधनाने सर्वसमावेशक नेतृत्वं हरपलं, अजित पवारांनी व्यक्त केल्या भावना

भाजपाचे खासदार गिरीश यांचं निधन झालं. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रूग्णालयात आज ( २९ मार्च ) त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वयाच्या ७२ व्या वर्षी बापट यांची प्राणज्योत मालावली. गेल्या दीड वर्षांपासून दुर्धर आजाराशी सुरू असलेली त्यांची झुंज अपयशी ठरली आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी गिरीश बापट यांच्या निधानावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. गिरीशभाऊंच्या निधनानं पुणे जिल्ह्याचं सर्वसमावेशक नेतृत्वं हरपलं आहे, असं अजित पवार म्हणाले.

“गिरीश बापट यांचं निधन हे पुणे जिल्ह्यातील आम्हा सर्वपक्षीय राजकीय, सामाजिक कार्यकर्त्यांसाठी मोठा धक्का आहे. महाराष्ट्राचं सर्वसमावेशक, सुसंस्कृत राजकारणाचा चेहरा म्हणून गिरीशभाऊंकडे पाहिले जायचं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत तयार झालेल्या गिरीशभाऊंनी जात, धर्म, पंथ, प्रांत, भाषा, पक्षभेदांच्या भिंती ओलांडून समाजकार्य, विकासाचं राजकारण केलं,” असं अजित पवारांनी सांगितलं.

हेही वाचा : “गिरीश बापट यांच्या निधनाचं वृत्त अत्यंत दुःखद!” शरद पवार यांनी व्यक्त केल्या भावना

“टेल्को कंपनीतल्या कामगार नेत्यापासून सुरु झालेला त्यांचा प्रवास पुणे महापालिकेचे नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष, आमदार, मंत्री, खासदार पदापर्यंत पोहचला. चार दशकांच्या प्रदीर्घ राजकीय वाटचालीत गिरीशभाऊंना पुणेकरांचं अलोट प्रेम मिळालं. १९९५ पासून २०१५ पर्यंत सलग पाच वेळा ते आमदार झाले. २०१९ ला खासदार झाले. राज्याचे मंत्री, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून पुणे शहर, जिल्ह्याच्या विकासातलं त्यांच योगदान कायम स्मरणात राहील,” असं अजित पवारांनी म्हटलं.

हेही वाचा : “महाराष्ट्राने सच्चा, प्रामाणिक कार्यकर्ता गमावला”; गिरीश बापट यांच्या निधानानंतर मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केल्या भावना!

“काही महिन्यांपासून त्यांची प्रकृती ठिक नव्हती. आजाराशी ते निर्धारनं लढत होतं. बरे होऊन सार्वजनिक जीवनात ते पुन्हा सक्रीय होतील, हा विश्वास आम्हा सगळ्यांना होता. तो विश्वास खोटा ठरला. गिरीशभाऊंच्या निधनानं पुणे जिल्ह्याचं सर्वसमावेशक नेतृत्वं हरपलं आहे. पुणे जिल्ह्याला, राज्याला गिरीशभाऊंची उणीव कायम जाणवेल, त्यांची आठवण कायम येत राहील,” अशा भावना अजित पवारांनी व्यक्त केल्या आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-03-2023 at 13:52 IST

संबंधित बातम्या