पुणे बस स्थानकातील अपुऱ्या सुविधांविरोधात सुप्रिया सुळेंचे आंदोलन

एस.टी. सेवा पुरवण्यात राज्य सरकार अपयशी ठरल्याचा आरोप

एसटीच्या सोयींसाठी सुप्रिया सुळे यांचे आंदोलन

राज्यातील विविध भागात प्रवास करण्यासाठी सामान्य माणसाला एस.टी. सेवा पुरवण्यात राज्य सरकार अपयशी ठरल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला. आजही बहुतांश विद्यार्थ्यांना पायपीट करत शाळा गाठावी लागते. बस स्थानकात योग्य त्या सुविधा नाहीत. परिवहन सेवेच्या महत्त्वाच्या प्रश्नावर राज्य सरकार गंभीर नाही असेही सुळे यांनी म्हटले आहे.

स्वारगेट एस.टी. आगारात राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्त्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. दिवाळीच्या सुट्ट्या असल्यामुळे एस.टी.ने गावी जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. अशात प्रवाशांना सुविधा मिळत नाहीत. त्यांचे हाल होत आहेत. बस स्थानकावर स्वच्छतेचाही अभाव आहे. बसेसच्या फेऱ्याही अपुऱ्या आहेत. याकडे सरकारने लक्ष दिले नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येईल असाही इशारा सुळे यांनी यावेळी दिला.

आलिशान कार्सचा सामान्य नागरिकांना फटका
राष्ट्रवादीचे आंदोलन असल्याने अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते त्यांच्या आलिशान कार घेऊन स्वारगेट बस स्टँडवर पोहचले. ज्याचा फटका सामान्य जनतेला बघायला मिळाला. एस.टी. च्या सोयी सुविधांसंदर्भात हे आंदोलन झाले मात्र याच आंदोलनाच्या वेळी लोकांना त्रास झाला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Ncp mp supriya sules protest for st facilities in pune