पुणे : सहपालकमंत्री या असंविधानिक पदाची निर्मिती राज्य शासनाकडून करण्यात आली आहे. असंविधानिक पदनिर्मितीमध्ये महाराष्ट्र देशात सर्वांत पुढे आहे, अशी टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी येथे केली. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाची मासिक आढावा बैठक मंगळवारी निसर्ग मंगल कार्यालय येथे झाली. बैठकीनंतर सुळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. खासदार सुळे म्हणाल्या, ‘राज्य सरकारने सहपालकमंत्री हे असंविधानिक पद निर्माण केले आहे. अशा पदांची निर्मिती करण्यात राज्य हे देशात सर्वांत पुढे आहे. राज्यापुढे अनेक महत्त्वाचे विषय आहेत. मात्र, त्यांकडे सरकारचे लक्ष नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दावोस दौरा झाल्यानंतर राज्यात किती गुंतवणूक आली, हे स्पष्ट होईल.

सन २०१९ मधील पहाटेचा शपथविधी हे अजित पवार यांच्या विरोधातील षड्यंत्र होते. हे षड्यंत्र कोणी रचले, हे माहिती नाही. मात्र, सन २०१९ मध्ये बैठका सुरू असताना मल्लिकार्जुन खरगे आणि शरद पवार यांच्या वाद झाला होता. त्यानंतर शरद पवार रागावून बाहेर गेले होते, असे विधान राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी केले होते. या संदर्भात सुळे यांच्याकडे विचारणा केली असता, त्या प्रक्रियेमध्ये माझा सहभाग नव्हता. या पद्धतीने शपथविधी होईल, असे वाटले नव्हते आणि अशी कोणती बैठक झाली का, याची मला माहिती नाही. शपथविधीमध्ये काय झाले, याचीही मला माहिती नाही,’ असे खासदार सुळे यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा :पुणे : कारवाईची भीती दाखवून महिलेची १३ लाखांची फसवणूक

बदलापूर येथील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीची कथित चकमक हा पोलिसांचा विषय आहे. मात्र, हा सर्व प्रकार चिंताजनक आहे. परभणी येथील युवकाचा मृत्यू, बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या हे अस्वस्थ करणारे आहे, असेही खासदार सुळे म्हणाल्या. बीड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदी अजित पवार यांची नियुक्ती झाली आहे. त्यामुळे बीडमध्ये शांतता प्रस्थापित होईल का, असे विचारले असता एका व्यक्तीकडून नव्हे, तर सरकारकडून जिल्ह्यातील गैरप्रकार बंद झाले पाहिजेत, असे त्या म्हणाल्या.

हेही वाचा :पुणे : खासगी कंपनीतील रोखपालाकडून दोन कोटींचा अपहार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राज्य सरकार की ‘नाराज सरकार’?

स्पष्ट बहुमत असूनही राज्य सरकारचे कामकाज अजून सुरू झालेले नाही. मंत्रिमंडळाचा विस्तार, त्यानंतर पालकमंत्री नियुक्तीसाठी लागलेला वेळ, त्यावरून झालेली नेत्यांची नाराजी यावरून सरकारची पावले योग्य आहेत, असे दिसत नाही. हे राज्य सरकार आहे, की ‘नाराज सरकार’ अशी टीका खासदार डाॅ. अमोल कोल्हे यांनी केली. पालकमंत्रिपदावरून नेत्यांची नाराजी आहे. जाळ असल्याशिवाय धूर निघत नाही, अशा शब्दांत त्यांनी शिवसेनेतील नाराजीवर भाष्य केले. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचे नाव सातत्याने येत असल्याने नैतिकतेच्या मुद्द्यावर त्यांनी राजीनामा द्यावा, असेही डाॅ. कोल्हे यांनी स्पष्ट केले.