लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे: दारु पिताना झालेल्या वादातून भाच्याने मामाच्या डोक्यात गज घालून खून केल्याची घटना कोंढवा भागात घडली. याप्रकरणी भाच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आनंद शंकरराव काळंगिरे (वय ४५, रा. हनुमाननगर, पिसोळी) असे खून झालेल्या मामाचे नाव आहे. याप्रकरणी भाचा सचिन राम एलनवाड (वय २५ रा. हनुमाननगर, पिसोळी, मूळ रा. खानापूर नांदेड) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काळंगिरे यांचा मुलगा हनुमंत (वय २३, रा. रामनगर, रहाटणी) याने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
आणखी वाचा-पुणे- मुंबई द्रुतगतीमार्गावर दोन ट्रकचा भीषण अपघात; तीन जण जखमी
आनंद आणि त्यांचा भाचा सचिन यांच्यात दारु पिण्यावरुन वाद झाला होता. वादातून सचिनने मामा आनंद यांच्या डोक्यात गज मारला. उपचार सुरू असताना आनंद यांचा रुग्णालयात मृत्यू झाला. आनंद यांच्या मृत्यूप्रकरणी भाचा सचिनविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून सहायक पोलीस निरीक्षक विकास बाबर तपास करत आहेत.