प्रवाशांसह रेल्वेलाही फायदा नाही; चवथी गाडीही आली
पुणे रेल्वे स्थानकापासून विविध मार्गावर प्रवाशांना लोकल गाडय़ांप्रमाणे प्रवासाची सुविधा देण्याच्या उद्देशाने पुणे विभागाला प्रत्येकी दहा डब्यांच्या तीन नव्या डेमू (डिझेल मल्टिपल युनिट) गाडय़ा देण्यात आल्या. मात्र, त्या कोणत्या मार्गावर सुरू करायच्या हा आदेशच नसल्याचे कारण देण्यात येत असल्याने या गाडय़ा धूळखात पडून आहेत. खडकी रेल्वे स्थानकावर तीन डेमू बिनकामी उभ्या असताना चवथीही डेमू आली असून ती हडपसर स्थानकावर उभी करण्यात आली आहे. धूळखात असलेल्या या गाडय़ांमुळे रेल्वेला तोटाच होत असून, प्रवाशांनाही त्याचा फायदा मिळू शकत नाही.




लोहमार्गाचे विद्युतीकरण न झालेल्या आणि प्रवाशांची मागणी असलेल्या भागामध्ये लोकल गाडय़ांप्रमाणे सेवा देण्याच्या उद्देशाने डेमू गाडय़ा अत्यंत उपयुक्त ठरत आहेत. पुणे विभागात सर्वप्रथम पुणे-दौंड मार्गावर या गाडीची सुविधा देण्यात आली आहे. पुणे-दौंड-बारामतीबरोबरच पुणे ते सातारा, मिरज, कोल्हापूर त्याचप्रमाणे लोणंद, फलटण या मार्गावर डेमू गाडय़ा उपयुक्त ठरू शकणार आहेत. रेल्वेच्या पुणे विभागाकडूनही या मार्गाबाबत चाचपणी करण्यात आली आहे.
सातारा, मिरज, लोणंद, फलटण आदी भागांतून पुण्यात रोज ये-जा करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. या प्रवाशांना अधिकाधिक गाडय़ांची गरज असल्याने या मार्गावर डेमू गाडय़ांच्या सेवेला चांगला प्रतिसाद मिळू शकणार आहे. मात्र, नव्या गाडय़ा हाताशी येऊनही त्याबाबत अद्यापही कोणताच निर्णय झालेला नाही. पुणे विभागाकडून रेल्वे बोर्डाच्या आदेशाची वाट पाहण्याशिवाय काहीही केले जात नसल्याची सद्य:स्थिती आहे. सुमारे दीड ते दोन महिन्यांच्या कालावधीमध्ये पुणे विभागाला तीन नव्या डेमू गाडय़ा देण्यात आल्या.
रेल्वेच्या वतीने काही दिवसांपूर्वी पुणे-सातारा-मिरज मार्गावर डेमू गाडीची चाचणीही घेण्यात आली. ही चाचणी यशस्वी झाली. त्यानंतर कोणतीही हालचाल होऊ शकली नाही. सध्या खडकी रेल्वे स्थानकावरील मोकळ्या लोहमार्गावर डेमू लोकल उभ्या आहेत. सुटसुटीत आसने, डिजिटल फलक, फलाट नसलेल्या भागामध्ये गाडीत चढ-उतार करण्यासाठी व्यवस्था, स्वच्छतागृह आदींची सुविधा असलेल्या या गाडय़ा प्रवाशांच्या सेवेत कधी येणार, याचे उत्तर कोणाकडेही नाही.
एखाद्या वाढीव डब्याचीही मागणी नोंदविताना त्यातून मिळणारे उत्पन्न, प्रवाशांची मागणी आदी गोष्टी कळविल्या जातात. त्यानंतरच मागणी पूर्ण करण्यात येते. आता चार नव्या डेमू गाडय़ा पुण्याला मिळाल्या आहेत. त्या चालविण्याचे मार्ग, प्रवासी, उत्पन्न आदी सर्व गोष्टी पुणे विभागाने मागणीत नोंदविल्या असतील. असे असतानाही गाडय़ा सुरू करण्यास विलंब केला जात आहे. त्यातून रेल्वेचे लाखोंचे नुकसान होत असून, प्रवाशांनाही फायदा मिळू शकत नाही. त्यामुळे गरजेच्या मार्गावर तातडीने या गाडय़ा सुरू व्हाव्यात.
– हर्षां शहा, अध्यक्षा, रेल्वे प्रवासी ग्रुप