पुणे : लोणी काळभोर, बिबवेवाडी, तसेच हडपसरमधील फुरसुंगी परिसरात गंभीर गुन्हे करणाऱ्या नऊ सराइतांना परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त डाॅ राजकुमार शिंदे यांनी तडीपार करण्याचे आदेश दिले.

प्रेमलता मुकेश करमावत (वय ४५, रा. मंतरवाडी, फुरसुंगी), पंकज मुकेश करमावत (वय २५, रा. उत्तमनगर), मनोज रतन गुमाणे (वय ५०, रा. भीमनगर, मुंढवा), शेख अहमद उर्फ बबलू सूरज सय्यद (वय १९, रा. सुखसागनरनगर, अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी), सागर संदीप गुडेकर (वय २४, रा. इंदिरानगर, कदमवाक वस्ती, लोणी काळभोर), जाफर शाजमान इराणी (वय ४३, रा. पठारे वस्ती, लोणी काळभोर), मजलूम हाजी सय्यद (वय ४८, पठारे वस्ती, लोणी काळभोर), शब्बीर जावेद जाफरी (वय ३८, रा. पठारे वस्ती, लोणी काळभोर ), शाजमान हाजी इराणी (वय ६२, रा. पठारे वस्ती, लोणी काळभोर) अशी तडीपार केलेल्यांची नावे आहेत.

करमावत, गुमाणे यांच्याविरुद्ध गावठी दारू विक्री, बबलू सय्यद विरूद्ध खुनाचा प्रयत्न, गुडेकरविरुद्ध खून, बेकायदा शस्त्र बाळगणे, इराणी टाेळीविरुद्ध फसवणूक, चोरी करणे असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. आरोपींना शहर आणि जिल्ह्यातून तडीपार करण्याचा प्रस्ताव लोणी काळभोर, मुंढवा, कोंढवा पोलिसांनी तयार केला होता. हा प्रस्ताव परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त डाॅ. राजकुमार शिंदे यांच्याकडे पाठविण्यात आला होता. संबंधित प्रस्ताव मंजूर करून पोलीस उपायुक्त शिंदे यांनी करमावत, गुमाणे, गुडेकर, इराणी, सय्यद, जाफरी यांना शहर आणि जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्याचे आदेश देण्यात आले.

परिमंडळ पाचमधील ११ टोळ्यांमधील ७६ गुंडांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) कारवाई करण्यात आली आहे. तसेच २० गुंडांविरुद्ध झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये (मकोका) कारवाई करण्यात आली आहे. ४१ सराइतांना तडीपार करण्यात आले असून एकूण मिळून १३७ सराइतांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. तडीपार गुंड शहरात आढळून आल्यास त्वरीत परिमंडळ पाच पोलीस उपायुक्त कार्यालयात (दूरध्वनी – ०२०- २६८६ १२१४) या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

शहरात गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ झाली आहे. नाना पेठेतील टोळीयुद्ध, तसेच कोथरूडमधील नीलेश घायवळ टोळीकडून सामान्य नागरिकावर गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली. शहरातील गुन्हेगारी घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सराइतांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई सुरू केली आहे. वाहनांची तोडफोड, दहशत माजविण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.