पुणे : ‘मूठभर उद्योगपतींना, श्रीमंतांना कर्ज देऊन देशाला ‘सुपर इकोनॅामिक पॅावर’ करण्यापेक्षा, करोडो जनतेला कर्जपुरवठा उपलब्ध करून देशाला ‘महाशक्ती’ करणे ही काळाची गरज आहे. त्यासाठी सत्तेचे विकेंद्रीकरण झाले, तसे संपत्तीचे विकेंद्रीकरण झाले पाहिजे,’ असे मत केंद्रीय भूपृष्ठ मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी पुण्यात व्यक्त केले. हे सांगताना त्यांनी गरीब लोकांना कर्ज दिल्यानंतर पैसे बुडतात, हा समज खोडून काढला.

‘लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी लि.’च्या ३१व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित स्नेहमेळाव्यात गडकरी बोलत होते. ‘लोकमान्य’चे संस्थापक अध्यक्ष डॉ. किरण ठाकूर, उपाध्यक्ष अजित गरगट्टी या वेळी उपस्थित होते.

गडकरी म्हणाले, ‘एकविसाव्या शतकात विश्वसनीयता हे एकमेव भांडवल असून, ग्रामीण भागात सहकारी सोसायट्या, अर्थपुरवठा करणाऱ्या नागरी सहकारी बँका या भरवशावरच कर्ज उपलब्ध करून देत आहेत. या व्यक्ती प्रामाणिकपणे नियमित कर्जाची परतफेड करतात. त्यामुळे देशात महाराष्ट्र, गुजरात आणि कर्नाटक राज्यात सहकार चळवळ मोठ्या प्रमाणात पसरली आहे. देशाच्या सकल दरडोई उत्पन्नात (जीडीपी) ६५ टक्के जनता कृषी पतपुरवठा करणाऱ्या सहकारी बँकांद्वारे लाभ घेऊन मोठा हातभार लावत आहे. सुक्ष्म, लघू उद्योजकता विभागालाही (एमएसएमई) याचा मोठा फायदा होत असला, तरी उत्तर प्रदेश, दिल्ली, हरियाणा यांसारख्या राज्यात सहकार चळवळ रुजू शकली नाही.’

‘देशात ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात होत असलेले स्थलांतर खुशीने नाही, तर नाईलाजास्तव होत आहे. ग्रामीण भागात लोकसंख्या जास्त असूनही तेथे विकासदर कमी आहे. लहान लोकांना दिलेले कर्ज, त्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी आधार देण्यातून जे आर्थिक परिवर्तन होईल, ते देशासाठी महत्त्वाचे आहे. हे काम सहकार चळवळ करीत आहे. त्यामुळे सहकार चळवळीत गोंधळ आहे, असे सरसकटपणे म्हणता येणार नाही. सहकारातून उभे राहिलेले कृषी उद्योग, दुग्ध व्यवसाय असलेल्या जिल्ह्यांचे दरडोई उत्पन्न इतर जिल्ह्यांपेक्षा जास्त आहे. आगामी काळात सहकार क्षेत्राची निकोप वाढ व्हायला हवी, या क्षेत्रातून चांगले नेतृत्त्व उभे राहिले पाहिजे,’ असेही गडकरी यांनी नमूद केले.

‘कोकणात सांस्कृतिक विद्यापीठ’

बेळगाव सीमावादाच्या प्रश्नावरून कर्नाटक सरकारविरोधात वृत्तपत्रात लिखाण केल्याने मला तुरुंगात टाकेपर्यंत तयारी झाली होती. मात्र, या संकटातून गडकरी यांनी मला सोडविल्याची आठवण डाॅ. ठाकूर यांनी करून देत त्यांचा ‘संकटमोचक’ म्हणून उल्लेख केला, तर कर्नाटक सरकारने प्रचंड त्रास दिल्याने ‘लोकमान्य’ची शाखा पुण्यात उघडली असल्याचे स्पष्ट केले. लवकरच ‘लोकमान्य कल्चरल फाउंडेशन’च्या शाखा देशभर सुरू करण्यात येणार आहेत. तसेच, बॅ. नाथ पै यांच्या नावाने कोकणात ‘सांस्कृतिक विद्यापीठ’ स्थापन करण्यात येणार आहे, असे डाॅ. ठाकूर यांनी सांगितले.