पितृपंधरवड्यामुळे फळभाज्यांच्या मागणीत वाढ झाली आहे. भेंडी, गवार या फळभाज्यांच्या दरात वाढ झाली आहे. अन्य फळभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डात रविवारी (१८ सप्टेंबर) राज्य; तसेच परराज्यांतून ८० ते ९० ट्रक फळभाज्यांची आवक झाली. आंध्रप्रदेश, कर्नाटक, गुजरातमधून मिळून ५ ते ६ ट्रक हिरवी मिरची, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूतून १ टेम्पो शेवगा, कर्नाटकातून ३ ते ४ टेम्पो घेवडा, गुजरातमधून ३ टेम्पो कोबी, इंदूरहून ७ ते ८ टेम्पो गाजर, मध्यप्रदेश आणि गुजरातमधून मिळून १० ते १२ ट्रक लसूण, गुजरातमधून २ टेम्पो भुईमूग शेंग, आग्रा, इंदूरमधून मिळून ४० ते ४२ ट्रक बटाटा अशी आवक परराज्यांतून झाली, अशी माहिती घाऊक बाजारातील प्रमुख अडते विलास भुजबळ यांनी दिली.

हेही वाचा >>> पुणे : सेवा पंधरवड्यानिमित्ताने १२५ विविध दाखले वाटप

पुणे विभागातून सातारी आले ५०० ते ६०० गोणी, कोबी ५ ते ६ टेम्पो, फ्लॉवर १० ते १२ टेम्पो, भेंडी ५ ते ६ टेम्पो, गवार ५ ते ६ टेम्पो, ढोबळी मिरची ८ ते १० टेम्पो, टोमॅटो ७ ते ८ हजार पेटी, तांबडा भोपळा ८ ते १० टेम्पो, भुईमूग शेंग ५० ते ६० गोणी, मटार ४०० गोणी, कांदा ५० ट्रक अशी आवक बाजारात झाली.

पालेभाज्या तेजीत
पालेभाज्यांची आवक स्थिर असून दर तेजीत आहेत. पावसामुळे पालेभाज्यांच्या प्रतवारीवर परिणाम झाला आहे. रविवारी मार्केट यार्डातील तरकारी विभागात काेथिंबिरीच्या सव्वालाख जुडी; तसेच मेथीच्या ५० हजार जुडींची आवक झाली.

हेही वाचा >>> पिंपरी : स्थानिक लोकप्रतिनिधींना डावलून निर्णय घेण्याचा मुख्यमंत्र्यांकडून चुकीचा पायंडा ; खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची खंत

डाळिंब, खरबूज, कलिंगड, पपईच्या दरात वाढ
आवक कमी झाल्याने डाळिंब, खरबूज, कलिंगड, पपईच्या दरात वाढ झाल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. सीताफळ, लिंबांच्या दरात घट झाली आहे. चिकू, अननस, पेरू, संत्री, मोसंबीचे दर स्थिर आहेत. फळबाजारात लिंबू एक हजार ते १२०० गोणी, डाळिंब २५ ते ३० टन, पपई ४ ते ५ टेम्पो, कलिंगड ३ ते ४ टेम्पो, खरबूज १ ते २ टेम्पो, सीताफळ २० ते ३० टन, संत्री १० ते १२ टन, मोसंबी ७० ते ८० टन अशी आवक फळबाजारात झाली.

पितृपंधरवड्यामुळे फुलांच्या मागणीत घट
पितृपंधरवड्यामुळे फुलांच्या मागणीत घट झाली आहे. पावसामुळे फुले भिजली आहेत. चांगल्या प्रतीच्या फुलांना दर मिळाले आहेत. बाजारात आवक झालेल्या फुलांपैकी ६० ते ७० फुले पावसामुळे खराब झाली आहेत, अशी माहिती फूल बाजारातील व्यापारी सागर भोसले यांनी दिली.

हेही वाचा >>> पिंपरी : शिंदे-फडणवीस सरकारच्या निषेधार्थ राष्ट्रवादीचे आंदोलन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मासळीच्या दरात वाढ
गणेशोत्सवानंतर मटण, मासळी, चिकनच्या मागणीत वाढ झाली आहे. मासळीच्या दरात १० ते २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. गणेश पेठेतील मासळी बाजारात रविवारी खोल समुद्रातील मासळी १५ ते २० टन, खाडीतील मासळी ३०० ते ४०० टन, नदीतील मासळी एक ते दीड टन, आंध्रप्रदेशातून रहू, कतला, सीलन मासळीची १५ ते २० टन आवक झाली, असे मासळी बाजारातील व्यापारी ठाकूर परदेशी यांनी दिली. चिकनच्या दरात किलोमागे २० रुपयांनी वाढ झाली आहे.