scorecardresearch

आधार जोडणी झालेल्या विद्यार्थ्यांनाच आता शालेय पोषण आहाराचा लाभ

आधार जोडणी पूर्ण करण्यासाठी डिसेंबर अखेरपर्यंतची मुदत

आधार जोडणी झालेल्या विद्यार्थ्यांनाच आता शालेय पोषण आहाराचा लाभ
(संग्रहीत छायाचित्र)

राज्यातील शासकीय आणि अनुदानित शाळांमध्ये आधार कार्ड असलेल्या विद्यार्थ्यांनाच आता शालेय पोषण आहाराचा लाभ दिला जाणार आहे. त्यामुळे येत्या डिसेंबरपर्यंत विद्यार्थ्यांचे आधार कार्ड काढून ते शालेय पोषण आहाराशी जोडण्याचे निर्देश शिक्षण विभागाकडून देण्यात आले असून, अद्याप आधार कार्ड नसलेल्या विद्यार्थ्यांचे आधार कार्ड काढण्याचे काम शिक्षकांना करावे लागत आहे.

वित्त विभागाच्या शासन निर्णयानुसार वैयक्तिक लाभाच्या योजना पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाभार्थ्यांचा माहितीसाठा (डेटाबेस) तयार करून तो आधार कार्डशी जोडला जाणार आहे. त्यानुसार त्यानुसार शालेय पोषण आहार योजनेचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांची आधार कार्ड नोंदणी प्रक्रिया डिसेंबर २०२२ पर्यंत पूर्ण करणे अनिवार्य आहे. पात्र सर्व शाळांतील लाभार्थ्यांची आधार कार्ड नोंदणी पूर्ण झालेली असणे आवश्य आहे. मात्र अद्यापही काही लाभार्थ्यांची आधार नोंदणी पूर्ण झालेली नाही. त्यामुळे संबंधित लाभार्थ्यांची आधार नोंदणी करून घेण्यासाठी कालबद्ध कार्यक्रमाचे नियोजन करावे. त्याचप्रमाणे दर महिन्याच्या २८ तारखेपर्यत या विद्यार्थ्यांची माहिती सादर करण्याच्या सूचना प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून शिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे १ जानेवारी २०२३ पासून आधार कार्डची जोडणी शालेय पोषण आहाराशी असलेल्या विद्यार्थ्यांनाच शालेय पोषण आहाराचा लाभ देण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

प्राथमिक शिक्षण संचालनालयाच्या निर्देशांनुसार केंद्रप्रमुख आणि मुख्याध्यापकांडून विद्यार्थ्यांचे आधार कार्ड काढून ते संलग्न करण्यात येत आहेत. त्यामुळे शिक्षकांना आधार कार्ड जोडणीचे अतिरिक्त काम करावे लागत आहे.

…शालेय पोषण आहापासून वंचित ठेवले जाणार का? –

“विद्यार्थ्यांचे आधार कार्ड काढण्यासाठी शिक्षक काम करत आहेत. मात्र कागदपत्रे अपूर्ण असणे, विद्यार्थ्यांच्या बोटांचे ठसे न उमटणे आदी तांत्रिक अडचणी येत आहेत. प्राथमिक शिक्षण संचालनालयाच्या पत्रानुसार डिसेंबर अखेरीपर्यंत आधार जोडणी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. आधार जोडणी नसलेल्या विद्यार्थ्यांना जानेवारीपासून शालेय पोषण आहापासून वंचित ठेवले जाणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.” असे मुख्याध्यापक महामंडळाचे राज्य प्रवक्ते महेंद्र गणपुले यांनी सांगितले आहे.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Only aadhaar linked students now get the benefit of school nutrition pune print news msr

ताज्या बातम्या