पुणे : ‘श्री विठ्ठलाची मूर्ती सामाजिक अभिसरण आणि प्रबोधनाचा संदेश देणारी आहे,’ असे मत ज्येष्ठ मूर्तिशास्त्र अभ्यासक डॉ. गो. बं. देगलूरकर यांनी शनिवारी व्यक्त केले. ‘इंडी हेरिटेज’च्या वतीने ‘मास्टर क्लास’ उपक्रमाची सुरुवात डॉ. देगलूरकर यांच्या हस्ते झाली. त्या वेळी ‘विठ्ठल मूर्ती’ या विषयावर ते बोलत होते.

डॉ. देगलूरकर म्हणाले, ‘उपासकांच्या कल्पनेनुसार देवतेची मूर्ती घडवली जाते. मूर्तीच्या माध्यमातून तत्त्वविचार, अध्यात्म सांगितले जाते. तत्कालीन सामाजिक परिस्थितीची गरज लक्षात घेऊन विखुरलेल्या समाजाने एकाच देवतेची उपासना करावी, म्हणून संतांनी विठ्ठलमूर्तीचा विचार केला. विठ्ठलाच्या माध्यमातून लोकांना जोडण्याचा प्रयत्न केला.’

‘पंढरपूरचा ‘विठ्ठल’ हा ‘विष्णू’च असून, विठ्ठलमूर्ती ही ‘विष्णू’ची योगस्थानक मूर्ती आहे. त्यामुळे श्री विठ्ठलाच्या मूर्तीला दोनच हात आहेत. योगमूर्ती असल्याने त्यात चक्र, गदेसारखी शस्त्रे नाहीत,’ असेही त्यांनी नमूद केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘मूर्तिशास्त्राला प्राचीन ऐतिहासिक वारसा लाभला आहे. अनेक प्राचीन ग्रंथांमध्ये त्याचे उल्लेख आढळतात. सुरुवातीला पाषाणखंड रूपात आढळणाऱ्या मूर्ती कालांतराने मनुष्यरूपात घडविल्या जाऊ लागल्या. देवतेचे श्रेष्ठत्व दर्शवण्यासाठी मूर्तीला अधिक हात, मस्तके, अलंकार अशी सजावट सुरू झाली. मूर्तिशास्त्राने सर्वसामान्यांचे चर्मचक्षू आणि भावचक्षू यांचा सूक्ष्म विचार केला,’ असे त्यांनी सांगितले.तुषार जोशी यांनी प्रास्ताविक केले. अनुश्री घिसाड यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले.