लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागामार्फत येत्या २ मार्च रोजी बारामती येथे होणाऱ्या नमो महारोजगार मेळाव्यामध्ये पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यातील औद्योगिक, तसेच इतर सेवा क्षेत्रातील सुमारे २० हजारपेक्षा जास्त रिक्त पदांवर भरती केली जाणार आहे. या मेळाव्यासाठी १२० पेक्षा जास्त खासगी उद्योजकांनी आतापर्यंत सहभाग नोंदवला आहे.

कौशल्य विकास विभागाच्या उपआयुक्त अनुपमा पवार यांनी ही माहिती दिली. बारामती येथील विद्या प्रतिष्ठानचे कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय, बारामती येथे हा मेळावा होणार आहे. दहावी, बारावी, कोणत्याही शाखेतील पदवीधर अथवा पदविकाधारक, पदव्युत्तर पदवी, आयटीआय, अभियांत्रिकी पदवी अशी पात्रता असणारे स्त्री-पुरुष उमेदवार या पदांसाठी पात्र असणार आहेत. मनुष्यबळाची आवश्यकता असलेले उद्योजक, आस्थापना https://rojgar.mahaswayam.gov.in/#/employer_registration या दुव्यावर नोंदणी करून मेळाव्यासाठीची रिक्त पदे मेळाव्यासाठी कळवू शकतात. तर इच्छुक उमेदवारांनी https://rojgar.mahaswayam.gov.in/#/register या संकेतस्थळावर आपली नावनोंदणी करणे आवश्यक आहे.

आणखी वाचा-पिंपरी : अमृत भारत योजनेंतर्गत चिंचवड, देहूरोड, लोणावळा रेल्वे स्थानकांचा विस्तार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महारोजगार मेळाव्यात विविध विभागांच्या योजनांची, स्टार्टअप व विविध महामंडळे यांच्याद्वारे स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य देणाऱ्या योजनांची माहिती देण्यात येणार आहे. तसेच मेळाव्यात अल्पमुदतीचे प्रशिक्षण देणाऱ्या संस्थाही सहभागी होणार असल्याने कौशल्य प्रशिक्षणास इच्छुक उमेदवारांना त्याचा लाभ घेता येईल. उमेदवारांनी मेळाव्याच्या ठिकाणी प्रत्यक्ष मुलाखतीस येताना सर्व शैक्षणिक कागदपत्रे, पासपोर्ट आकाराची छायाचित्रे, अर्ज, आधार कार्डच्या प्रती सोबत आणणे आवश्यक आहे, असे पवार यांनी सांगितले.