छत्रपती संभाजी महाराजांच्या १६८५ मधील तैलचित्राची प्रतिकृती बालगंधर्व कलादालनात पाहण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे. झुंजार शिलेदार सेवा समितीतर्फे १० ते १४ मे या कालावधीत ‘छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सवा’ चे आयोजन करण्यात आले असून, त्यानिमित्ताने ही संधी उपलब्ध होणार आहे.
संभाजी महाराजांचे हे चित्र लंडन येथील ब्रिटिश लायब्ररीत आहे. त्याची प्रतिकिृती लायब्ररीशी पत्रव्यवहार करून प्राप्त करण्यात आली आहे. ती प्रदर्शनासाठी ठेवण्यात आली आहे, अशी माहिती समितीचे ओंकार जगदाळे यांनी दिली. याचबरोबर जन्मोत्सवामध्ये शिवकालीन शस्त्रांचे, दुर्मिळ नाण्यांचे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. हे प्रदर्शन १० ते १२ मे कालावधीत बालगंधर्व कलादालन येथे सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत सर्वासाठी खुले आहे. तसेच १० मे रोजी संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित असलेल्या संकेतस्थळाचे आणि महाराष्ट्रातील दुर्गाची माहिती देणाऱ्या अॅण्डरॉईड अॅप्लिकेशनचे उद्घाटन करण्यात येणार आहे.