पुणे : अवयव प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेतील १२८ रुग्णांना या वर्षभरात जीवदान मिळाले आहे. पुणे विभागात ४९ मेंदूमृत व्यक्तींचे अवयवदान करण्यात आले. त्यातून १३१ अवयव मिळाले असून, त्यांचे गरजू रुग्णांवर प्रत्यारोपण करण्यात आले आहे. त्यात मूत्रपिंड प्रत्यारोपणाची संख्या सर्वाधिक आहे.

जागतिक अवयव प्रत्यारोपण दिन आज साजरा होत आहे. या पार्श्वभूमीवर पुणे विभागीय अवयव प्रत्यारोपण समितीने या वर्षभरातील अवयव प्रत्यारोपणाची आकडेवारी जाहीर केली आहे. पुणे विभागात पुण्यासह सातारा, सांगली, नाशिक, सोलापूर, कोल्हापूर, जळगाव आणि धुळे या जिल्ह्यांचा समावेश आहे. समितीच्या आकडेवारीनुसार, पुणे विभागात यंदा १ जानेवारी ते १२ ऑगस्ट या कालावधीत ४९ मेंदूमृत व्यक्तींचे अवयवदान करण्यात आले. त्यातून १३१ अवयव मिळाले आणि त्यांचे १२८ रुग्णांवर प्रत्यारोपण करण्यात आले. यात मूत्रपिंड प्रत्यारोपण ७१, यकृत प्रत्यारोपण ४१, हृदय ४, मूत्रपिंड व स्वादुपिंड प्रत्यारोपण १, हृदय व फुप्फुस प्रत्यारोपण १, फुप्फुस प्रत्यारोपण ९, मूत्रपिंड व हृदय प्रत्यारोपण १ अशा प्रत्यारोपणांचा समावेश आहे.

गेल्या वर्षी ७० मेंदूमृत व्यक्तींचे अवयवदान करण्यात आले. त्यातून मिळालेल्या १८१ अवयवांचे १७६ रुग्णांवर प्रत्यारोपण करण्यात आले. त्यात मूत्रपिंड प्रत्यारोपण ९३, यकृत प्रत्यारोपण ५८, हृदय प्रत्यारोपण ६, मूत्रपिंड व स्वादुपिंड प्रत्यारोपण ४, हृदय व फुप्फुस प्रत्यारोपण १, फुप्फुस प्रत्यारोपण १४ अशा प्रत्यारोपणांचा समावेश आहे, असे विभागीय अवयव प्रत्यारोपण समितीच्या आकडेवारीतून समोर आले आहे.

आशासेविकांवर मोहिमेची जबाबदारी

राज्यात हजारो जण अवयव प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत आहेत. अवयवदानाबाबत जागृती नसल्याने यासाठी फारसे नागरिक पुढे येत नसल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात अवयवदानाबाबत व्यापक जनजागृती करण्याच्या उद्देशाने सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत ‘अंगदान–जीवन संजीवनी अभियानां’तर्गत ३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत अवयवदान जनजागृती पंधरवडा राबविण्यात येत आहे. या अभियानात आता राज्याच्या आरोग्यसेवेचा कणा असलेल्या आशासेविकांना सहभागी केले जाणार आहे. अवयवदानाची मोहीम तळागाळात पोहोचविण्याची जबाबदारी आशासेविकांवर देण्यात आली आहे. या माध्यमातून राज्यातील खेड्यापाड्यांत ही मोहीम पोहोचून अवयवदानात वाढ होण्यास मदत होणार आहे.

पुणे विभागातील अवयव प्रत्यारोपण

वर्ष – मेंदूमृत दाते – अवयव प्रत्यारोपण

२०२१ – ४४ – ९७
२०२२ – ४६ – ११८
२०२३ – ५८ – १५८
२०२४ – ७० – १८१
२०२५ (१२ ऑगस्टपर्यंत) – ४९ – १३१