चिखलीत चार दिवसीय बैलगाडा शर्यतींचे आयोजन; दीड कोटी रुपयांची बक्षिसे, राजकीय नेत्यांची उपस्थिती; भाजपकडून जोरदार शक्तिप्रदर्शनाची तयारी

पिंपरी-चिंचवड शहरात यंदा प्रथमच चार दिवसीय बैलगाडा शर्यतींचा आखाडा भरणार आहे. पंचक्रोशीतील बैलगाडा मालक, चालक सहभागी होणाऱ्या या बैलगाडा शर्यतींत सर्व मिळून दीड कोटी रुपयांची बक्षिसे दिली जाणार आहेत.

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात यंदा प्रथमच चार दिवसीय बैलगाडा शर्यतींचा आखाडा भरणार आहे. पंचक्रोशीतील बैलगाडा मालक, चालक सहभागी होणाऱ्या या बैलगाडा शर्यतींत सर्व मिळून दीड कोटी रुपयांची बक्षिसे दिली जाणार आहेत. भाजपचे आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकाराने चिखलीत होत असलेल्या या शर्यतींची जोरदार तयारी सुरू आहे. या निमित्ताने शहरात बडय़ा राजकीय नेत्यांची वर्दळ असणार आहे.

गेल्या दोन वर्षांत करोना संकटामुळे गावोगावचे उत्सव साजरे झाले नाहीत. करोना निर्बंध हटवल्यामुळे यंदापासून थाटामाटात उत्सव पार पडू लागले आहेत. टाळगाव चिखली-जाधववाडी येथील रामायण मैदानात २८ ते ३१ मे दरम्यान सकाळी सात ते सायंकाळी सात या वेळेत या शर्यती पार पडणार आहेत. माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रकाश जावडेकर यांच्या उपस्थितीत २८ मे ला उद्घाटन सोहळा होणार आहे.

त्यानंतर, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, खासदार गिरीश बापट, रणजितसिंह निंबाळकर, आमदार आशिष शेलार, नीतेश राणे, प्रसाद लाड, राहुल कुल, गोपीचंद पडळकर, जयकुमार गोरे, माजी आमदार नरेंद्र पाटील आदी नेते वेगवेगळय़ा दिवशी शर्यतीसाठी हजेरी लावणार आहेत. ३१ मे ला बक्षीस वितरण समारंभ होणार आहे. आमदार महेश लांडगे, माजी महापौर राहुल जाधव, नितीन काळजे यांनी या स्पर्धाचे आयोजन केले आहे.

बक्षिसांमध्ये जेसीबी, ट्रॅक्टर, जीप..

बैलगाडा शर्यतींच्या बक्षिसांमध्ये रोख रकमांची बक्षिसे तर आहेच. त्याचप्रमाणे, जेसीबी मशीन, बोलेरो जीप, ट्रॅक्टर, बुलेट, विविध कंपन्यांच्या दुचाकी, एलईडी टीव्ही, फ्रीज अशी अनेक आकर्षक बक्षिसे जाहीर करण्यात आली आहेत. त्यामुळे बैलगाडा शर्यतींविषयी पंचक्रोशीत प्रचंड उत्सुकता दिसून येत आहे.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Organizing bull races prizes presence political leaders bjp prepares strength ysh

Next Story
संभाव्य पुरामुळे नागरिकांचे स्थलांतर करावे लागणारी शहरातील दहा ठिकाणे निश्चित; पुराचा धोका असणारी २३ ठिकाणे
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी