पुणे : पुणे रेल्वे स्थानकात आता कृत्रिम प्रज्ञा (एआय) तंत्रज्ञानाधारित कॅमेऱ्यांतून नजर ठेवली जात आहे. स्थानकाचे प्रवेशद्वार आणि तिकीट आरक्षण केंद्राच्या परिसरात चार अत्याधुनिक ‘इंटरनेट प्रोटोकॉल कॅमेरे’ बसविण्यात आले आहेत. कृत्रिम प्रज्ञेच्या सहाय्याने हे कॅमेरे स्थानकातील संशयास्पद हालचाली टिपत आहेत. त्याबाबत ते रेल्वे प्रशासनाला तातडीने माहितीही देत आहेत.

रेल्वे मंत्रालयाने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कामकाजात अधिकाधिक व्हावा, यासाठी पावले उचलली आहेत. याअंतर्गत प्रत्येक रेल्वे विभागाला कोणत्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करता येईल, याबाबत प्रस्ताव मागविले होते. पुणे विभागाने एकूण सात प्रकल्प मुख्यालयाकडे सादर केले होते. त्यातील टेहळणी यंत्रणेचा प्रस्ताव मुख्यालयाने मंजूर केला. त्याअंतर्गत हा पथदर्शी प्रकल्प राबविला जात आहे. आता स्थानकावर ‘इंटरनेट प्रोटोकॉल कॅमेरे’ बसवून टेहळणी केली जात आहे. जिओ प्लॅटफॉर्म्सची उपकंपनी जिओ थिंग्ज लिमिटेड कंपनीला हे काम देण्यात आले आहे.

आणखी वाचा-आईला भेटायला आला अन् जाळ्यात अडकला; मेफेड्रोन तस्करी प्रकरणात फरार आरोपीला अटक

रेल्वे स्थानकाचे प्रवेशद्वार आणि बाहेर पडण्याचे द्वार, आरक्षण केंद्रातील तिकीट खिडक्या येथे हे चार कॅमेरे बसविले आहेत. यामुळे प्रवाशांची संख्या मोजणे आणि ते रांगेत आहेत की नाहीत या बाबी कळत आहेत. रेल्वे स्थानकातील संशयास्पद हालचाली, तिकिटाचा काळाबाजार, बेकायदा पद्धतीने रांगा लावणे आदी गोष्टी या कॅमेऱ्यांमुळे शोधता येत आहेत. त्यामुळे त्यांना आळा घालणेही शक्य होत आहे.

रेल्वेतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थानकातील तिकीट आरक्षण केंद्राच्या परिसरातील एआय कॅमेऱ्यांनी २६ फेब्रुवारी ते ३ मार्च या कालावधीत ९ हजार ६२५ जणांची नोंद केली. त्यातील ७ हजार ३११ वारंवार येणारे आणि २ हजार ३१४ हे पहिल्यांदाच येणारे होते. भेट देणाऱ्यांपैकी १ हजार ५०० हून अधिक जण तिकीट खिडकीच्या परिसरात सुमारे पाच मिनिटे होते. याचवेळी सुमारे ७०० ते ९०० जण तिथे सुमारे तासभर रेंगाळत होते.

आणखी वाचा-स्वयंपाकाच्या सिलिंडरमधून गॅस चोरी; पत्र्याच्या खोलीत बेकायदा व्यवसाय करणारे दोघे अटकेत

कशा पद्धतीने नजर?

  • स्थानकात येणाऱ्या प्रवाशांची संख्या कळते.
  • संशयास्पद हालचाल करणारा प्रवासी ओळखता येतात.
  • तिकिटांचा काळाबाजार शोधण्यास मदत होते.
  • बेकायदा पद्धतीने लावलेल्या रांगाही कळतात.
  • स्थानकातील गैरप्रकारांचाही तातडीने शोध घेता येतो.