मराठीचे भले करण्यासाठी स्थापन झालेल्या आणि विज्ञानविषयक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी आणि मराठी ज्ञान भाषा व्हावी, यासाठी विज्ञानविषयक पुस्तके तयार करण्याची जबाबदारी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची होती. ते काम आजवर झाले नाही, अशी खंत ज्येष्ठ विज्ञानलेखक निरंजन घाटे यांनी शुक्रवारी व्यक्त केली.

महाराष्ट्र साहित्य परिषेदच्या ११६ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॅा. नितीन करमळकर यांच्या हस्ते निरंजन घाटे यांना मसाप जीवनगौरव पुरस्कार, तर परिषदेचे अध्यक्ष डॅा. रावसाहेब कसबे यांच्या हस्ते वाङ्मयीन चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते किशोर बेडकिहाळ यांना भीमराव कुलकर्णी कार्यकर्ता पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्याप्रसंगी घाटे बोलत होते. परिषदेच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष डॅा. शिवाजीराव कदम, उपाध्यक्ष राजीव बर्वे, कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्षा सुनीताराजे पवार या वेळी उपस्थित होत्या.

वाचकांनीच मला घडविले. माझे लेखन वाचकांनी वाचले म्हणून मी लिहिता राहिलो, अशा शब्दांत घाटे यांनी वाचकांविषयी कृतज्ञता व्यक्त केली. वाचक असतील तोपर्यंत लेखक लिहित राहतील, असेही ते म्हणाले.

आपल्या बोलण्यातून अनेकदा प्रश्न निर्माण होतात. पण, त्यानंतर आपल्या मागे कोणी उभे राहत नाही, याची जाणीव होते. साहित्यकार लेखनातून, बोलण्यातून व्यक्त झाल्यानंतर साहित्य संस्थांनी त्यांच्या पाठिशी उभे राहावे, अशी अपेक्षा करमळकर यांनी व्यक्त केली. तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांना साहित्याकडे आकृष्ट होण्यासारखे सध्या तरी काही घडताना दिसत नाही. त्यामुळे त्यांना साहित्याची रुची आणि कुतूहल निर्माण करणारे लेखन होणे गरजेचे आहे, असेही त्यांनी सांगितले.

बेडकिहाळ म्हणाले, नवे महापुरुष ज्याप्रकारचा महाराष्ट्र घडवत आहेत, त्यामध्ये एक भयाची सावली आपल्यावर आहे. त्यांना नवीन काहीतरी सुचते आणि शांतताप्रिय महाराष्ट्राला भोंग्याची आठवण होते. उपयोगितेची जागा उपद्रवाने आणि असभ्य भाषेने घेतली आहे. विचारवंत आणि बुद्धिजीवींची मने संशयाने भरलेली आहेत. मनातले खरे बोलायला ज्या समाजात भीती वाटते. राजसत्ता संरक्षण देत नाही. साहित्य संस्था संरक्षण करु शकत नाही हादेखील अनुभव आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

साहित्यिकांचे संरक्षण यापूर्वीही कोणी करत नव्हते. आत्मसंरक्षण करण्याची जबाबदारी साहित्यकांवरच आहे. त्यासाठी लेखकाची नाळ सतत समाजाशी जोडलेली असली पाहिजे. ती तुटली की, आपण असुरक्षित असणारच. आताचा साहित्यिक समाजातील दु:ख, विरोध बघतो. नात्यातील गुंता सोडवतो. समाजाला, निसर्गाला आणि स्वत:लाही प्रश्न विचारतो. – डॉ. रावसाहेब कसबे, अध्यक्ष, महाराष्ट्र साहित्य परिषद