पिंपरी-चिंचवडमध्ये किरकोळ कारणावरून दिघी येथे तलवार आणि कोयत्याने काही जणांवर वार करत २० वाहनांची तोडफोड केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी चार जणांना ताब्यात घेतलं असून नऊ जण फरार आहेत. या भयानक घटनेचा थरारक व्हिडिओ देखील समोर आला असून यावर पोलिसांकडून काहीही प्रतिक्रिया दिली गेलेली नाही. 

घटने प्रकरणी अर्जुनसिंग, संग्रामसिंग बाधा, अभिजित घोरपडे, सुरजितसिंग बाधा, करणसिंग, सोन्या, संगीता कौर, गजलसिंग बाधा, हुकूमसिंग बाधा, अजयसिंग टाक आणि इतर तीन अशा एकूण १३ जनांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री उशिरा १३ जणांच्या टोळक्याने धुडगूस घालत दिघी परिसरातील २०- २५ वाहनांची तोडफोड केली. तर, काही जणांवर कोयत्याने आणि तलवारीने वार केल्याचं कळतंय. या प्रकरणी दिघी पोलीस स्पष्ट बोलत नाहीत. माहिती देण्यास टोलवाटोलवी करत आहेत. प्राथमिक माहितीनुसार कबूतरबाजीवरून भांडण झाल्याचं पुढे येत असून यातूनच वाहनांची तोडफोड आणि कोयते आणि तलवारीने वार करण्यात आले आहेत. 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नागिराकांमध्ये भीतीचे वातावरण –

आयर्नमॅन, डॅशिंग पोलीस ऑफिसर अशी ख्याती असलेले पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी पदभार स्वीकारताना, शहरातील नागरिक भयमुक्त राहतील अशी हमी दिली होती. मात्र, ते येऊन वर्ष उलटले मात्र गुन्हेगारी आटोक्यात आलेली नाही. सातत्याने पत्रकार परिषदांमधून कायम प्रकाशझोतात राहणाऱ्या आयुक्तांच्या राज्यात नागरिकांची सुरक्षा रामभरोसे असल्याचं चित्र दिघी येथील घटनेवरून अधोरखित होत आहे.