पिंपरी : भारत सरकारने प्रतिबंध केलेल्या परदेशी बनावटीच्या ई-सिगारेटचा दोन लाख ३२ हजार रुपयांचा साठा अमली पदार्थ विरोधी पथकाच्या कारवाईत बावधन येथे जप्त करण्यात आला आहे. रविवारी दुपारी सव्वादोन वाजताच्या सुमारास बावधनमधील शिंदेनगर येथे ही कारवाई करण्यात आली. अमली पदार्थविरोधी पथकातील पोलीस हवालदार गणेश बाबासाहेब करपे यांनी याबाबत बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार २५ वर्षीय व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बावधनमधील एका दुकानात आरोपीने परदेशी बनावटीच्या विविध कंपन्यांच्या इ-सिगारेट विक्रीसाठी साठवून ठेवल्या होत्या. पोलिसांनी दुकानावर छापा टाकून संपूर्ण साठा जप्त केला आहे. बावधन पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.
तरुणावर लोखंडी कोयत्याने वार
जुन्या वादाचा राग मनात धरून तीन अल्पवयीन मुलांनी एका तरुणावर लोखंडी कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले. ही घटना पिंपरीतील सम्राट चौक, मैत्री बौद्ध विहार परिसरात सुमारास घडली. याबाबत १७ वर्षीय तीन अल्पवयीन मुलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २३ वर्षीय तरुणाने संत तुकाराम नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या मित्रांसह रिक्षामध्ये बसलेले होते. दरम्यान दुचाकीवर आलेल्या तिघा विधीसंघर्षित बालकांनी जुन्या वादाच्या रागातून हल्ला केला. एका अल्पवयीन मुलाने लोखंडी कोयत्याने फिर्यादीच्या डोक्यात, पाठीवर आणि हातावर वार केले, तर इतर दोघांनी शिवीगाळ करत लाथाबुक्यांनी मारहाण केली. हल्ल्यात फिर्यादी गंभीर जखमी झाला आहे. संत तुकारामनगर पोलीस करत आहेत.
मोबाइल हिसकावणाऱ्या दोन चोरट्यांना अटक
फोनवर बोलत असलेल्या तरुणाचा पन्नास हजार रुपये किमतीचा मोबाइल दोन चोरट्यांनी हिसकावून नेला. ही घटना वाकडमध्ये घडली. सुनील मोहमद शिंदे (वय ४०) आणि विजय शुभाष काळे (वय २१, दोघेही रा. मातोबा नगर, दत्तमंदिर रोड, वाकड, पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत हुजेफ रफीक गोलंदाज (वय २८, रा. सांगली) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या बहिणीशी मोबाइलवर स्पीकर ऑन करून बोलत असताना, काळ्या पिवळ्या रिक्षामधून आलेल्या दोघा चोरट्यांपैकी एकाने हातातील मोबाइल जबरीने हिसकावून नेला. वाकड पोलिसांनी तातडीने शोध मोहिम राबवून दोन्ही आरोपींना अटक केली आहे. वाकड पोलीस करत आहे.
उसने दिलेले पैसे मागितल्याने महिलेला मारहाण
उसने दिलेले दीड लाख रुपये परत मागितल्याने संतापलेल्या शेजाऱ्याने एका महिलेला स्टीलच्या कड्याने मारहाण करून गंभीर जखमी केले. ही घटना इंद्रायणीनगर, भोसरी येथे घडली. याप्रकरणी ४२ वर्षीय व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत लांडेवाडी, विठ्ठलनगर, भोसरी येथील ३० वर्षीय महिलेने रविवारी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेने आरोपीने उसने घेतलेले दीड लाख रुपये परत मागितले. या कारणावरून संतापलेल्या आरोपीने शिवीगाळ करून हातातील स्टीलच्या कड्याने महिलेच्या डोक्यावर आणि नाकावर मारहाण केली. या हल्ल्यात फिर्यादी गंभीर जखमी झाली आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस करत आहेत.
दुचाकीच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू
भरधाव वेगातील दुचाकीने धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात एका ७३ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला. ही घटना रहाटणी येथे बीआरटी रस्ता ओलांडत असताना घडली. गोविंद बाबुराव पाटील असे मृत्यू झालेल्या वृद्धाचे नाव आहे. याप्रकरणी त्यांच्या मुलाने काळेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दुचाकी चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादींचे वडील गोविंद हे रहाटणीत बीआरटी रस्ता ओलांडत होते. त्यावेळी भरधाव वेगात दुचाकीवरून आलेल्या आरोपीने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात गोविंद गंभीर जखमी होऊन उपचारादरम्यान मयत झाले. काळेवाडी पोलीस करत आहेत.
मोशीमध्ये गुटखा विक्री करणारा तरुण अटक
शासनाने प्रतिबंध केलेले गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ विक्री करताना एक तरुण रंगेहात पकडला गेला. ही कारवाई एमआयडीसी भोसरी पोलिसांनी मोशीतील तापकीर नगर परिसरात केली. सुनिल बिरमाराम चौधरी (वय १९, रा. तापकीर नगर, मोशी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीस अंमलदार महेश रघुनाथ खांडेकर यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने शासनाच्या आदेशाला हरताळ फासून सात हजार ८६६ रुपयांचा गुटख्याचा साठा विक्रीसाठी ठेवला होता. तपासादरम्यान हा साठा जप्त करण्यात आला असून, आरोपीविरोधात कारवाई करण्यात आली आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करत आहे.
