महापालिकेशी संबंधित विविध प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करावी, त्यासाठी आवश्यक कार्यवाही तातडीने करावी, अशी मागणी पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांनी पालिकेचे प्रशासक तथा आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे बैठकीत केली. पिंपरी मतदारसंघातील बहुतांश प्रश्नांकडे पालिकेचे दुर्लक्ष होत असल्याची बाब आमदार बनसोडे यांनी प्रशासकांच्या निदर्शनास आणून दिली. पिंपरी मतदारसंघातील विविध समस्यांसाठी आमदार बनसोडे यांनी पालिका आयुक्त राजेश पाटील यांच्यासमवेत बैठक घेतली. सबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी बैठकीला हजर होते.

यासंदर्भात बनसोडे म्हणाले की, मतदारसंघातील प्रश्नांसाठी आयुक्तांना अनेक निवेदने दिली होती. त्यावर समाधानकारक कार्यवाही झाली नव्हती. त्यामुळे बैठक घ्यावी लागली. निगडी प्राधिकरणातील पेठ क्रमांक २६ येथील नियोजित कचरा केंद्राला विरोध होत असल्याने बिगरनिवासी भागात दुसरी जागा शोधण्याची मागणी आयुक्तांकडे केली. याच ठिकाणी स्वप्नपूर्ती येथील एमआयडीसीच्या जागेतील रस्त्याचे काम लवकर पूर्ण करावे. हेडगेवार भवनाच्या जागेत व्यापारी संकुल, नवीन जलतरण तलाव व क्रीडा संकुल उभारण्याच्या दृष्टीने प्रकल्प अहवाल तयार करावा. कर्करोग रूग्णालय सुरू करण्याची प्रक्रिया वेगवान करावी. तृतीयपंथी व्यक्तींच्या दवाखान्यासाठी जागा द्यावी. मिलींदनगर येथे बुद्धविहार तसेच सांस्कृतिक भवन बांधण्यासाठी जागा उपलब्ध करुन द्यावी. दलित वस्ती सुधार योजनेतून नवीन कामे करण्याचा प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीकडे पाठवावा. चिंचवड पत्राशेड झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प गाळेवाटप रद्द करून मूळ झोपडपट्टीधारकांना घरे उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया सुरु करावी. भक्तीशक्ती ते मुकाई चौक या उड्डाणपुल व रस्त्याचे काम लवकर मार्गी लावावे, अशा विविध मागण्या आयुक्तांसमवेत झालेल्या बैठकीत करण्यात आल्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यासंदर्भात तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिल्याचे बनसोडे यांनी सांगितले.